केडगावच्या उपसरपंच पदी दत्तात्रय शेळके यांची बिनविरोध निवड, मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केला भाजप प्रवेश

दौंड (अब्बास शेख) : केडगाव (ता.दौंड) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी दत्तात्रय शेळके यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या अगोदरचे उपसरपंच प्रशांत शेळके यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे उपसरपंच पद रिक्त झाले होते.

दत्तात्रय शेळके यांनी माजी आमदार रमेश थोरात यांच्या गटाकडून ग्रामपंचायत निवडणूक लढवत विजय मिळवला होता मात्र विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या विकासकामांच्या कार्यपद्धतीवर आकर्षित होऊन त्यांनी मागील वर्षी ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत कुल गटाला पाठिंबा दिला होता. त्यांच्या पाठिंब्यामुळे कुल गटाला उपसरपंच पद मिळवणे सोपे झाले होते.

आज त्यांनी भाजपा तालुकाध्यक्ष हरिभाऊ ठोंबरे तसेच धनजी शेळके, आप्पासाहेब हंडाळ, महादेव शेळके, किरण देशमुख, पिरतू सुळ, मनोज होळकर, शहाजी गायकवाड, नारायण राऊत, अशोक हंडाळ, बंडू शेळके, दादा पिसे, दिनेश राऊत, सतीश हंडाळ, नवनाथ गायकवाड, निलेश कुंभार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया आज दि.५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सुरु झाली. ११ ते १२ दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करायचा होता. यासाठी सरपंच पूनम गौरव बारवकर, माजी उपसरपंच प्रशांत शेळके, व तिन्ही गटाचे ग्रामपंचायत सदस्य हजर होते. आजची उपसरपंच निवड प्रक्रिया  सरपंच पूनम गौरव बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि या निवडणुकीत सचिव म्हणून काम पाहणारे ग्रामविकास अधिकारी काळे भाऊसाहेब यांच्या निगराणीखाली सुरु झाली.

दत्तात्रय शेळके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अन्य कोणत्याही सदस्याने ११ ते १२ या वेळेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही त्यामुळे दुपारी ०२:०० वाजता दत्तात्रय शेळके यांची केडगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा निवड प्रक्रियेचे अध्यक्ष पूनम गौरव बारवकर यांनी केली. यावेळी कुल गटाने फटाके फोडून एकच जल्लोष केला.