दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची दलित संघटनांची मागणी

अख्तर काझी

दौंड : दौंड तालुक्यातील पुणे-सोलापूर महामार्गावर असणाऱ्या स्वामी चिंचोली गावाच्या हद्दीमध्ये पंढरपूरला जाणाऱ्या महिला भक्तांना कोयत्याचा धाक दाखवून लुटण्यात आले तसेच त्यांच्यासोबत असणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली होती.

दोन दिवस उलटून गेले तरी या घटनेतील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही, पोलीस प्रशासनाच्या या अपयशाला दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करीत त्यांना निलंबित करावे अशी मागणी शहरातील विविध दलित संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. दि. 2 जून रोजी दलित संघटनांच्या वतीने पोलीस प्रशासनाला याबाबतचे निवेदन देण्यात आले. यावेळी दलित संघटनांचे पदाधिकारी अमित सोनवणे, प्रमोद राणेरजपूत, भारत सरोदे, सचिन खरात, बबन भागवत, पांडुरंग गायकवाड, सागर उबाळे, संतोष गायकवाड, राजू भालसेन,राजू जाधव आदी उपस्थित होते.

निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, स्वामी चिंचोली येथे पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कोयत्याचा धाक दाखवून लुटण्यात आले, त्यांच्यासोबत असणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले, या घटनेमुळे तालुक्याची मान शरमेने झुकली असून तालुक्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. 48 तास उलटून गेल्यानंतरही आरोपींना अटक नाही. या घटनेला दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी हेच जबाबदार असून त्यांना निलंबित करण्यात यावे. महामार्गावर हॉटेल व्यावसायिकांकडून वसुली करण्यापेक्षा महामार्गावरील सुरक्षेकडे लक्ष दिले असते तर सदरची घटना घडली नसती असा आरोप दलित संघटनांच्या वतीने निवेदनातून करण्यात आला आहे.

या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी तसेच सक्षम उपविभागीय पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करावी अशी मागणी सुद्धा निवेदनात करण्यात आली आहे.