Cultural art – कलाकारांच्या चरितार्थाचा विचार करा, सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्या : अखिल भारतीय कलाकार महासंघाचे प्रशासनाकडे साकडे



दौंड : शहर प्रतिनिधी

दौंड तालुका ग्रामीण व शहरी भागातील कलावंतांच्या संस्कृतिक कार्यक्रमास प्रशासनाने परवानगी द्यावी अशी मागणी कलाकारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या अखिल भारतीय कलाकार महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. महासंघाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

दौंड तालुक्याच्या ग्रामीण व शहरी भागामध्ये अनेक कलावंत आहेत. त्यांची संपूर्ण उपजीविका त्यांच्या कले वरच अवलंबून आहे. मात्र मागील दोन वर्षापासून सततच्या लॉक डाऊन मुळे सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नाही,त्यामुळे कलाकारांना कोणतेही काम नसल्याने त्यांच्यावर व कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. सध्या राज्या सहित  जिल्ह्यांमध्येही कोरोना आटोक्यात येत असल्याची परिस्थिती आहे, सर्वत्र जनजीवन पूर्वपदावर येत आहे. राजकीय पक्षांचे मोर्चे, आंदोलने तसेच लग्न, समारंभांना परवानगी देण्यात येत आहे. परंतु कलाकारांना त्यांच्या कार्यक्रमांना मात्र परवानगी मिळत नाही. कलाकारांची कुटुंबे त्यामुळे मोठ्या आर्थिक अडचणीत सापडली आहेत, ज्यामुळे काही कलाकारांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. कलाकार व त्यांच्या कुटुंबीयांना पुन्हा सावरण्यासाठी प्रशासनाने त्यांना नियम पालनाच्या अटींवर कार्यक्रमांना परवानगी द्यावी व त्यांच्या चरितार्थासाठी दरमहा 10 हजार रुपये मानधन म्हणून द्यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा कलाकारांना आपल्या उपजीविकेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलने करावे लागतील असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. 

निवेदन देतेवेळी महासंघाचे अध्यक्ष भारत सरोदे, संतोष माने, चंद्रकांत लोंढे, संजय जाधव, दत्तू घोडे व राजू भालसेन आदी उपस्थित होते.