Crime – बारामतीमध्ये मोठे वैद्यकीय कांड उघडकीस, रुग्णांच्या जीवाशी खेळणारी मोठी टोळी जेरबंद



|सहकारनामा|

बारामती : बारामतीमध्ये मोठे वैद्यकीय कांड उघडकीस आले असून या कांडामध्ये सहभागी असणाऱ्या अनेकांची धरपकड करण्यात आली आहे.

बारामतीमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनच्या नावाखाली  पॅरासिटामॉलच्या  गोळ्यांचे पाणी देण्यात येऊन अनेकांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार बारामती पोलिसांनी उघडकीस आणला आहे. 

बनावट रेमडीसीवीर इंजेक्शन तयार करून त्याची सुमारे 35 हजार रुपयांना विक्री करण्यात आल्याचे समोर येत असून या बनावट इंजेक्शनमुळे काही जणांचा मृत्यू झाल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.

बारामती पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार  बारामतीमधील काहीजण  पॅरासिटामॉल या पेनकिलर गोळ्यांचे पाणी तयार करून ते पाणी  रेमीडिसीवीर या इंजेक्शनच्या मोकळ्या बाटलीत भरून ते रेमडीसीवीर इंजेक्शन म्हणून विकत असल्याची माहिती मिळाली होती. हि माहिती मिळताच बारामती तालुका पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे व्यूहरचना आखत खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे रेमडीसीवीर इंजेक्शनचा काळाबाजर करणाऱ्या आरोपींशी संपर्क साधण्यात आला होता. 

सदर टोळीतील एका आरोपीने हे एक इंजेक्शन 35 हजार रुपयांना मिळेल असे सांगून त्यांना  पेन्सिल चौकामध्ये बोलावून घेतले. यावेळी बारामती ग्रामीण पोलिसांनी पेन्सिल चौकात सापळा लावून रात्री 12:30 वाजता  आरोपी प्रशांत घरत आणि शंकर भिसे हे पांढऱ्या रंगाची असलेली फॉर्च्यूनर कार ( MH43 MV 9696 या आले. यावेळी खबऱ्या आणि त्यांची भेट होताच पोलिसांनी त्वरित या ठिकाणी धाड मारत चौघांना ताब्यात घेतले.

यावेळी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. कारण बारामती येथील कोविड सेंटरमध्ये साफ सफाई चे काम करणारा संंदिप गायकवाड हा येथे रुग्णांना देण्यात येणारे रेमडीसीवीर इंजेक्शनच्या मोकळ्या बाटल्या गोळा करून त्यामध्ये पॅरासिटीमॉल चे पाणी  भरून या कांडातील मुख्य सुत्रधार असणाऱ्या दिलीप गायकवाड याच्याकडे देत असल्याचे समोर आले. 

हे सर्व करण्यासाठी त्या सफाई कर्मचाऱ्याला एका बॉटलला 10 ते 12 हजार मिळत होते आणि पैश्यांच्या बदल्यात तो  सिरिंजच्या सहाय्याने या बाटल्यांमध्ये पॅरासिटीमॉल चे पाणी भरून देत होता. आणि त्याचे सहकारी आणि यातील मुख्य सूत्रधार हे बनावट रेमडेसिव्हीर इंजेक्शन तयार करून ते सुमारे 35 हजार रूपयांना  ब्लॅक मार्केटमध्ये विकत होते. 

बारामती तालुका पोलिसांनी हे कांड करणाऱ्या भवानीनगर येथील प्रशांत सिद्धेश्वर घरत (वय 23 वर्ष) शंकर दादा भिसे (वय 22 वर्षे, रा. काटेवाडी ता. बारामती) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 2 इंजेक्शन ताब्यात घेतली तर त्या दोघांकडे कसून चौकशी केल्यानंतर दिलीप ज्ञानदेव गायकवाड (रा. काटेवाडी) यातील 3रा  आरोपी समोर आला. तर भिगवण येथील संदिप संजय गायकवाड या चौथ्या आरोपिलाही पोलिसांनी पकडून चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.आतापर्यंत या रॅकेटमध्ये चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर यात अजून कोण कोण सामील आहे याची माहिती काही दिवसात या रॅकेटच्या माध्यमातून समोर येणार आहे.

या सर्व आरोपींवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमन कायदा, औषधे व सौदर्यप्रसाधने कायदा, औषध किंमत नियंत्रण कायद्यन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या कारवाईबद्दल ग्रामीण पोलिस अधिक्षकांच्या वतीने बारामती ग्रामीण पोलिस ठाण्याला 25 हजाराचे बक्षिस जाहिर करण्यात आले असून या कारवाईमध्ये पोलिस निरिक्षक महेश ढवाण, हवालदार आर. जे. जाधव, आर. एस. भोसले, डी. एन. दराडे, निखिल जाधव  यांसह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी  सहभाग घेतला असून त्यांची नावे समजू शकली नाही.