Crime – गावठी पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या तरुणास उरुळी कांचनमध्ये अटक



लोणी काळभोर : सहकारनामा (हनुमंत चिकणे)

उरुळी कांचन (ता. हवेली)  येथील ग्रामपंचायत हद्दीतील एलाईट चौकातून संशयितरित्या गावठी पिस्तुल व जिवंत काडतुस घेऊन फिरत असलेल्या एका तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या (ग्रामीण) पोलिसांनी अटक केली आहे.

सोमनाथ बाळासाहेब कांचन (वय- ३४, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार महेश वसंत गायकवाड यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ कांचन हा उरुळी कांचन परिसरातील एलाइट चौकात संशयास्पदरित्या गावठी पिस्तुल घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस हवालदार निलेश कदम यांना एका गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती.  या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोलिस हवालदार निलेश कदम, एस. डी. राऊत, जी. वाय. गायकवाड, व्ही. डी.निचीत, डी. ए. तांबे यांनी एलाईट चौक येथे सापळा रचला. यात सोमनाथ कांचन अलगद अडकला. 

दरम्यान, पोलिसांनी सोमनाथ कांचन याची झडती घेतली असता त्याच्याजवळ ५०,००० रुपये किमतीचे एक पितळी बडीचे लोखंडी बरल असलेले गावठी पिस्टल व १००० रुपये किमतीचे एक जीवंत काडतुस आढळून आले.

पुणे जिल्हयाचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी ग्रामपंचायत निवडणूक अनुषंगाने पुणे जिल्हयात कोबींग ऑपरेशन राबविले होते. त्यासाठी जिल्हा व पोलीस स्टेशन स्तरावर वेगवेगळी पथके नेमण्यात आलेली होती. दि. ९/१/२०२१ रोजी रात्री १०.३० वा. चे सुमारास  स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस श्री.पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले सहा.पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, राजेंद्र थोरात, महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, विदयाधर निचित, दत्तात्रय तांबे, प्रमोद नवले यांचे पथक लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना उरुळीकांचन इलाईट चौक येथे आले असताना त्यांना एका पांढरे रंगाचे ॲक्टीव्हा मोपेडवर पांढरा रंगाचा शर्ट व निळी जीन पॅट घातलेला सोमा कांचन नावाचा इसम कमरेला गावठी पिस्टल लावून उरळीकांचन परिसरातील लोकांमध्ये दहशत करीत फिरत असून तो सध्या उरुळीकांचन कस्तुरी कार्यालयाचे शेजारी ॲक्टीव्हा गाडीवर उभा आहे अशी बातमी मिळालेने लगेच सदर गुन्हे शाखेचे पथकाने त्या ठिकाणी जावून सापळा रचून संशयास्पद रित्या मिळून आलेला व पळून जाण्याचे तयारीत असलेला सोमनाथ बाळासाहेब कांचन यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला खोचलेले एक गावठी पिस्टल व जिवंत काडतुस मिळून आले. 

 सदर मिळालेला मुद्देमाल जप्त करून आरोपीस पुढील कारवाईसाठी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे ताब्यात दिले. आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 आरोपी सोमनाथ कांचन याने सदर गावठी पिस्टल कोणत्या कारणासाठी व कोठून आणले ? त्याचा कोठे वापर केला आहे काय ? याबाबतचा अधिक पुढील तपास लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांचे मार्गदर्शनाखाली उरुळीकांचन दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड हे करीत आहेत.

आरोपी सोमनाथ कांचन याची उरुळीकांचन परिसरात दहशत असून बऱ्याच लोकांना तो दमदाटी व मारहाण सुद्धा करायचा. 

परंतु तो स्थानिक असल्याने व त्याच्या भीतीने लोक पोलीसात तक्रार देण्यास धजावत नसत. काही राजकीय पुढारी अशा लोकांचा निवडणुकीसाठी वापर करून घेतात ही खेदजनक बाब आहे.