Crime Time : दौंड शहर व परिसरात चोरांचा हैदोस…. लुटारू मोकाट



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)

शहर व परिसरात चोरट्यांनी वाढलेल्या थंडीचा फायदा घेत घरफोड्यांचा रतीबच चालू केला असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. खाटीक गल्ली, बेथेल कॉलनी सारख्या दाट वस्तीमध्ये चोरट्यांनी घरफोड्या करीत दौंड पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. 

या परिसरात चोरट्यांनी एकाच रात्रीत 10 ते 15 घरफोड्या केल्याने परिसरात आजही  घबराटीचे वातावरण आहे. या घरफोड्या नंतर चोरट्यांनी डॉ. आंबेडकर चौक परिसरातील काही दुकाने फोडण्याचा प्रयत्न केला, परंतु दुकानांच्या शटरला असणारी कुलुपे न तुटल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला, दौंडला येण्यासाठी रात्रीच्या वेळेत कुरकुंभ गावातील मुख्य चौकात थांबलेल्या एका व्यापाऱ्याला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून कुरकुंभ घाटरस्त्या खाली आणून शास्त्राचा धाक दाखवीत लुटण्यात आले, या  घटनेत जवळपास दोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे.

या  आधी सुद्धा शहरातील मुख्य रस्त्यावर वृद्ध नागरिकाला लुटण्यात आले होते, त्याचे चित्रण सुद्धा पोलिसांच्या कॅमेरा मध्ये दिसलेले आहे, शहरातील बंगला साईड परिसरात अनेक बंद फ्लॅट फोडण्यात आले आहेत. यापैकी एकाही घटनेतील चोरटे पोलिसांना सापडलेले नाहीत, त्यामुळे या चोरट्यांना मोकळे रान मिळत आहे. सध्या सर्वत्रच थंडी वाढू लागल्याने रात्री लवकरच सर्वत्र सामसूम होत आहे याचा फायदा उठवीत चोरटे आपला डाव साधण्यात यशस्वी होत आहेत. 

घरफोड्या करताना चोरटे घातक शस्त्रे बाळगत असल्याचे समोर येत आहे त्यामुळे दौंड पोलिसांनी वेळीच या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा किमती वस्तू बरोबरच आपला मौल्यवान जीव सुद्धा गमावण्याची  वेळ दौंडकरांवर येण्याची  शक्यता नाकारता येत नाही. शहर व परिसरात अप्रिय घटना घडण्या अगोदरच दौंड पोलिसांनी चोरट्यांना जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दौंड शहरातील प्रत्येक भागात ग्राम सुरक्षा दल तयार करणे, पोलिसांची  रात्रीची गस्त वाढविणे, रात्रीच्या वेळेस शहरात फिरणाऱ्या अनोळखी व्यक्तींची कसून चौकशी करणे अशा उपाय योजना पोलिसांनी अमलात आणाव्यात अशा सूचनाही नागरिक करीत आहेत.