दौंड शहरात घरफोडीचे सत्र सुरूच.. डिफेन्स कॉलनी परिसरातील बंद घर फोडून  3 लाख 32 हजाराच्या ऐवजाची चोरी

अख्तर काझी

दौंड : शहरातील डिफेन्स कॉलनी (बंगला साईड) परिसरातील बंद घर फोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील 3 लाख 32 हजार 941 रुपये किमतीचे सोन्या, चांदीचे दागिने व रोख रक्कम लुटून नेल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे शहरातील घरफोडीचे सत्र सुरूच असल्याचे चित्र आहे. याप्रकरणी अभिजीत रमेश यादव(रा. डिफेन्स कॉलनी, बांगला साईड, दौंड) यांनी फिर्याद दिली. दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 305,331(4) अन्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती ठाणे अंमलदार महेंद्र गायकवाड यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना डिफेन्स कॉलनी परिसरात दि. 2 जानेवारी रोजी रात्री 12.30 ते 3 जानेवारी रोजी सकाळी 7.30 च्या दरम्यान घडली. फिर्यादी आपल्या एकत्रित कुटुंबासह बंगला साईड परिसरातील डिफेन्स कॉलनी भागात राहतात. घरचे इतर कामानिमित्त बाहेरगावी गेलेले असल्याने घरी फक्त फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीच होत्या. त्यामुळे त्यांनी आपल्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीला कुलूप लावून ते खालच्या मजल्यावरील खोलीत झोपले होते.

दि. 3 जानेवारी रोजी सकाळी त्यांच्या नातलगाने त्यांना उठवून सांगितले की तुमच्या खोलीला बाहेरून कोणीतरी कडी लावलेली होती, आणि वरच्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा सुद्धा उघडा दिसत आहे. त्यामुळे फिर्यादी यांनी त्वरित वरच्या मजल्यावरील खोलीत जाऊन पाहिले असता, घरातील लाकडी कपाट व दिवाण तोडलेले दिसले व त्यामध्ये ठेवलेले दागिने व रक्कमही सापडली नाही. त्यामुळे त्यांची खात्री झाली की ते झोपेत असताना वरच्या मजल्यावरील खोलीचे कुलूप तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरातील सोन्या, चांदीचे दागिने(3 लाख 22 हजार रु.)व 10 हजार रु. रोख रक्कम चोरून नेली आहे.