दौंड : नववर्षाचे सर्वत्र आनंदात स्वागत होत असताना दौंड मध्ये मात्र नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शहरातील एका अल्पवयीन मुलीचा अत्यंत वाईट पद्धतीने विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर नराधमास स्थानिकांनी चोप दिल्यानंतर दौंड पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. नितीन गवळी असे आरोपीचे नाव असून दौंड पोलिसांनी त्याच्या विरोधात बाल लैंगिक शोषण संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार दि. 1 जानेवारी 2025 रोजी दु.2:00 च्या दरम्यान आरोपीने एका अल्पवयीन मुलीला घराबाहेर बोलाविले, जवळच असलेल्या एका खोलीत नेऊन तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. भेदरलेल्या मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार घरी सांगितल्याने घटना उघडकीस आली. घटनेची खबर स्थानिक युवकांना माहित पडल्याने त्यांनी आरोपीला चांगलाच चोप दिला.
पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून, त्याच्यावर सरकारी दवाखान्यात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सर्वत्र नववर्षाचे आनंदात व जल्लोषात स्वागत होत असताना दौंड मध्ये मात्र सदरची लज्जास्पद व संतापजनक घटना घडल्याने या नराधमाविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.