Crime : दौंड पोलीस, महसूल विभागाची धडक कारवाई! 4 वाळूमाफियांवर गुन्हा दाखल करून बोटींना दिली जलसमाधी



| सहकारनामा |

दौंड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू केली असतानाही तालुक्यातील वाटलुज गावातील भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांना दौंड पोलीस व महसूल विभागाने चांगलाच मोठा दणका दिला आहे.

या पथकाने वाळू माफियांच्या यांत्रिक बोटींना जलसमाधी देत 4 जणांवर गुन्हा दाखल केला. नाना विठ्ठल शेंडगे महंमद चांद भाई शेख (दोघे  रा. वाटलुज, दौंड) व त्यांचे दोन साथीदारांवर  गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली आहे. वाटलुज गावातील भीमा नदी पात्रामध्ये वाळू माफिया अवैध वाळू उपसा करीत असल्याची माहिती दौंड पोलिसांना मिळताच दिनांक 10 मे रोजी रात्री 9.30 वा. सुमारास दौंड पोलीस व महसूल विभागाच्या पथकाने वाळू माफियांच्या या अड्ड्यावर धाड टाकली. मात्र वाळू माफियांना पथक कारवाईसाठी येत असल्याची चाहूल लागताच नदीपात्रातील बोटींमधून उड्या मारीत माफिया पसार झाले. 

सदर ठिकाणाहून पथकाला दोन फायबर व दोन सेक्शन बोट तसेच अवैध उपसा केलेली वाळू असा 66 लाख 96 हजार रू चा मुद्देमाल मिळून आला. यांत्रिक बोटी पोलीस स्टेशन ला आणणे शक्य नसल्याने महसूल विभाग पथकाच्या मदतीने त्या उध्वस्त करीत पाण्यात बुडविण्यात आल्या असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी करीत आहेत.