Crime – ऑनलाइन जुगार अड्ड्यावर दौंड पोलिसांची धाड! 2 जणांवर गुन्हा दाखल, 76 हजारांचा मुद्देमाल जप्त



| सहकारनामा |

दौंड : शहरातील सरपंच वस्ती येथे चालविल्या जाणाऱ्या ऑनलाइन जुगार अड्ड्यावर दौंड पोलिसांनी धाड टाकीत दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. कारवाई मध्ये 76 हजार 690 रु.चा मुद्देमाल ही पोलिसांनी जप्त केला आहे. 

आदर्श अनिल जाधव (वय 23,रा. गोवा गल्ली, दौंड) स्वप्निल श्रीकांत रणदिवे (वय 29,रा. मीरा सोसायटी,दौंड) या दोघांवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 4, 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली. 

सरपंच वस्ती परिसरामध्ये बिगर परवाना ऑनलाइन जुगार चालू असल्याची खबर मिळताच दौंड पोलिसांनी दिनांक 3 मे रोजी सरपंच वस्ती येथील अर्जुन शिंदे यांच्या मालकीच्या बंदिस्त गाळ्यावर धाड टाकली असता या ठिकाणी आदर्श व स्वप्नील हे दोघे ऑनलाइन जुगार अड्डा चालविताना सापडले. 

पोलिसांना या  ठिकाणाहून जुगाराची साधने व रोख रक्कम असा एकूण 76 हजार 690 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक लोंढे करीत आहेत.

शहरात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत असताना फक्त पैशाच्या हव्यासापोटी असे अवैध धंदे करणारे शहरात कोरोना वाढीस घातक आहेत त्यामुळे असे धंदे करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार असल्याचे दौंड पोलिसांनी सांगितले.