– सहकारनामा
दौंड :
दौंड तालुक्यातील केडगाव-वाखारी रस्त्यावर केडगाव पोलिसांनी एक इनोव्हा कारमधून मोठा मद्य साठा जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी गाडी जप्त करून एकावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केडगाव पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले, हवालदार संपत खबाले आणि पोलीस जीप चालक आवाळे हे केडगाव येथे रस्त्यावर गस्त घालत असताना त्यांना गोपनीय खबऱ्या मार्फत एक चॉकलेटी रंगाच्या इनोव्हामध्ये एक व्यक्ती विदेशी दारुचा साठा घेऊन वाखारी-केडगाव रस्त्याने केडगावकडे येत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरील पोलिसांनी या इनोव्हा गाडीचा मागमूस काढत ती या रस्त्यावर थांबवून तिची झडती घेतली असता त्यांना त्यामध्ये विदेशी मद्यसाठा मिळून आला.
यावेळी पोलिसांनी वाहन चालक गणेश फराटे यास ताब्यात घेत त्याच्या गाडीतून सुमारे 79 हजार 200 रुपये किंमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त केला. तसेच गणेश फराटे या तरुणावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गाडीसह मुद्देमाल जप्त केल्याने या मुद्देमालाची एकूण किंमत हि 15 लाख 79 हजार 200 रुपये इतकी झाली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गंपले करित आहेत.