लोणी काळभोर : सहकारनामा (हनुमंत चिकणे)
लग्नात दिलेल्या गृहउपयोगी वस्तूंची मागणी केल्याने जावाई व त्याच्या भावाकडून सासऱ्याला शिवीगाळ करून लाकडी बांबूने मारहाण केल्याची घटना उरुळी कांचन (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील आमृतनगर येथे बुधवारी (ता. ०३ ) घडली.
भाऊसाहेब साहेबराव कुदांडे (वय- ४१, रा. आश्रमरोड, उरुळी कांचन, ता. हवेली ) असे मारहाण झालेल्या सासऱ्याचे नाव आहे.
कुदांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लोणी काळभोर पोलिसांनी जावई प्रसाद खुशाल तुपे व त्याचा भाऊ हृषीकेश खुशाल तुपे (रा. दोघेही आमृतनगर, उरुळी कांचन , ता. हवेली) यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब कुदांडे हे मजुरीचा व्यवसाय करतात. भाऊसाहेब कुदांडे यांच्या मुलगी श्रद्धा हिचा विवाह ०९ नोव्हें २०१९ रोजी आमृतनगर, उरुळी कांचन या ठिकाणी राहणाऱ्या प्रसाद तुपे यांच्याशी झाला होता.
मागील दोन महिन्यांपासून श्रद्धा ही माहेरी वडील भाऊसाहेब कुदांडे यांच्याकडे राहण्यास आहे. बुधवारी (ता. ०३ ) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास भाऊसाहेब व त्यांच्या पत्नी निता कुदांडे हे प्रसाद तुपे यांच्या घरी मुलीला दिलेले सोन्याचे दागिने परत देण्यासाठी गेले होते.
दरम्यान, भाऊसाहेब कुदांडे हे प्रसाद तुपे यांना म्हणाले की, “तुम्ही आमच्या मुलीला लग्नात दिलेले सर्व दागिने तुम्हाला परत दिले आहेत, आत्ता आम्ही तिला लग्नात दिलेल्या घर संसाराच्या वस्तू आमच्या आम्हाला परत द्या” असे म्हणाले असता प्रसाद तुपे याने शिवीगाळ करून बांबूच्या सहाय्याने मांडीवर व कंबरेवर मारहाण करण्यास सुरुवात केली. तर ऋषीकेश तुपे याने उरुळी कांचन परिसरात कसे राहता अशी दमदाटी करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
घरी आल्यानंतर मुलीशी चर्चा करून झालेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर शुक्रवारी (ता. ५ )लोणी काळभोर पोलिसात तक्रार देण्यासाठी आले. तरी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी करीत आहेत.