Covid Centre : कोरोना रुग्णांसाठी दौंड उपजिल्हा रुग्णालय ठरत आहे आशेचा किरण, डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचाऱ्यांकडून दिवस-रात्र कोरोना रुग्णांवर उपचार



– सहकारनामा

दौंड : (अख्तर काझी) शहर व तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येने कहरच केला आहे. रुग्णांच्या नातलगां पासून प्रशासनापर्यंत सर्वच या परिस्थितीपुढे हतबल झाल्याचे चित्र आहे. रुग्णांच्या उपचारासाठी शहरात खाटांची मारामार आहे, खाटा मिळाल्या तर औषधांचा तुटवडा जाणवतो आहे. 

कशी नशिबाने थट्टा आज मांडली म्हणण्याची वेळ कोरोना महामारी ने सर्वांवरच आणली आहे. या उद्भवलेल्या परिस्थितीला कोण जबाबदार? यावर चर्चा करण्याची ही वेळ नाही तर यातून नेमका मार्ग कसा काढावयाचा यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत आणि तोच प्रयत्न सध्या दौंड उपजिल्हा रुग्णालयाकडून होताना दिसतो आहे. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे त्यांचे सहकारी डॉक्टर्स, परिचारिका व इतर कर्मचारी दिवसरात्र कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी झगडत आहेत. आणि त्यामुळेच ज्या सामान्य रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचार घेणे परवडत नाही अशांना उपजिल्हा रुग्णालय एक वरदान…. आशेचा किरण ठरत आहे. डॉ. डांगे आणि सहकाऱ्यांनाही रुग्णाचे उपचार करताना काही मर्यादाही येत आहेत.

परंतु अशा परिस्थिती मध्येही जिद्द न हरता रुग्णालयाची ही टीम रूग्णांसाठी आपला जीव धोक्यात घालून सेवा देत आहे. शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी, संघटनांनी आपले राजकीय जोडे बाजूला ठेवीत जर एकत्र येत उपजिल्हा रुग्णालयाला मदतीचा हात दिला तर जास्तीत जास्त रुग्णांचा उपचार उपजिल्हा रुग्णालयात होऊ शकतो. 

आपापल्या पक्षाच्या वरिष्ठांची मदत घेत या रुग्णालयाला जर जास्तीच्या खाटा, औषधे, ऑक्सिजन पुरवठा मिळवून दिला तर डॉ. डांगे आणि टीम यांच्या प्रयत्नांना आणखीन बळ मिळेल. हा विचार करून सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत दौंड करांसाठी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत अशी सामान्यांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे. आमदार राहुल कुल यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन कोरोना रुग्णांवर सुरू असलेल्या उपचाराची पाहणी केली, रुग्णांशी संवाद साधत त्‍यांची विचारपूस केली. 

तसेच रुग्णालयात सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची माहिती घेतली. येथे उपचार घेणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सर्वतोपरी मदत करण्याचे काम आम्ही करीत आहोत तसेच रुग्णालयाला लागणाऱ्या प्रत्येक मदतीसाठी,त्यांच्या समस्या चे निवारण करण्या साठी प्रयत्नशील असल्याचे राहुल कुल यांनी सांगितले आहे. दौंड पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी अमित सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते निखिल स्वामी, पीटर फिलीप, सागर उबाळे,अशोक जाधव यांनीसुद्धा शहरातील कोरोना रुग्णांच्या कोविड सेंटर साठी जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

येथील कामगार मैदाना लगतची रेल्वे प्रशासनाची मोकळी इमारत तसेच शहरातील मंगल कार्यालये, लॉज प्रशासनाने ताब्यात घेऊन येथे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी त्यांनी तहसीलदार संजय पाटील यांच्याकडे केली आहे. असेच सामूहिक प्रयत्न सर्वांनीच केले तर दौंड मधील रुग्णांना उपचारासाठी वणवण भटकावे लागणार नाही.