अख्तर काझी
दौंड : खासदार संजय राऊत यांनी भीमा पाटस साखर कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे, आणि त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याची चौकशी व्हावी म्हणून पत्रही दिले आहे. मी स्वतः कारखान्याची सभासद असल्याने कारखान्यामधील घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी माझी भूमिका आहे असे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी वैशाली नागवडे यांनी स्पष्ट केले. सध्या खासदार राऊत यांनी भीमा पाटस व त्यांच्या संचालकांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तालुक्यातील राजकारण ढवळून निघाले आहे या पार्श्वभूमीवर नागवडे यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली.
वैशाली नागवडे म्हणाल्या, खासदार राऊत यांनी भीमा पाटस साखर कारखान्यात भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर काही लोक ना. शरद पवार यांना या प्रकरणात विनाकारण ओढत आहेत. पवार साहेबांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, हे भारतीय जनता पार्टी पक्षामधील अंतर्गत भांडण आहे. त्यामुळेच भाजपच्याच नामदेव ताकवणे यांनी भाजपाचे आमदार राहुल कुल चेअरमन असलेल्या कारखान्याची माहिती खासदार राऊत यांना पुरविली आहे हे जगजाहीर आहे. त्यामुळे पवार साहेबांचे नाव ह्या प्रकरणाशी जोडण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. व या मध्ये राजकारण आणू नये.
ना.शरद पवार व अजित पवार यांनी नेहमी सहकार वाचविण्याची भूमिका निभावली आहे. जेव्हा जेव्हा भीमा पाटस कारखाना अडचणीत आला तेव्हा प्रत्येक वेळी या दोघांनीही शेतकरी बांधवांचे हित जोपासण्यासाठी या कारखान्याला मदतीचा हातच दिला आहे. हा कारखाना टिकावा व येथील शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा हीच दोन्ही पवारांची भूमिका राहिली आहे.
आमदार राहुल कुल यांना हक्क भंग समितीचा अध्यक्ष केल्यानंतर आता खासदार राऊत भीमा पाटस वर भ्रष्टाचाराचा आरोप करीत आहेत, त्यांचे टायमिंग तर चुकले नाही ना असे त्यांना विचारले असता याचे उत्तर राऊतच देतील असे त्या म्हणाल्या. परंतु खासदार राऊत यांच्या खूप आधी आम्ही साखर आयुक्तांकडे भीमा पाटसच्या गैरव्यवहाराबाबत तक्रार केलेली आहे असेही नागवडे यांनी स्पष्ट केले.