Corona : दौंड तालुक्यात जनतेची ‛सेवा’ करणाऱ्या मोठ्या अधिकाऱ्यांनाही ‛कोरोनाची’ लागण



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यामध्ये कोरोनाने आपले जाळे सर्वत्र पसरवले आहे. कधी, कोण, कुठे कोरोनाचा शिकार होईल याची आता शाश्वती राहिली नाहीये.

दौंड तालुक्यामध्ये आज कोरोनाच्या अनुषंगाने अतिशय चिंताजनक गोष्टी घडू लागल्या असून तालुक्यातील मोठ्या पदावर असणारे अधिकारीच आता कोरोनाचे शिकार होऊ लागले आहेत. दिवस रात्र नागरिकांसाठी धडपडणारे हे अधिकारीच कोरोना पॉझिटिव्ह होऊ लागल्याने दौंडकरांच्या चिंता निश्चितच वाढल्या आहेत.

तालुक्यातील आरोग्य अधिकारी आणि कर्मचारीही आता या कोरोनाच्या चक्रव्यूहात सापडतात की काय असे चित्र तयार झाले असून अनेक सरकारी आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांनी आपले स्वॅब दिले आहेत. एक दोन दिवसांत त्यांचेही रिपोर्ट येणार आहेत. तालुक्यातील लोकांसाठी झटणाऱ्या या आरोग्य सेवक, कर्मचारी तसेच विविध खात्यांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना कोरोनाचा धोका जास्तच आहे हे कुणी नाकारू शकत नाही. 

कारण सध्या कोरोना रुग्णांची देखभाल, त्यांच्या टेस्ट, त्यांची काळजी ही याच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना घ्यावी लागते त्यातून या सेवकांना कोरोनाच्या थेट संपर्कात येऊन काम केल्याने याचा सर्वात जास्त धोका हा असतोच तसेच ज्यांना शासनाने जबाबदारी दिली आहे त्या अधिकाऱ्यांनाही लोकांमध्ये जाऊन काम केल्याशिवाय गत्यंतर उरत नाही त्यामुळे या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नागरिकांनी कितीही आभार मानले तरी ते कमीच आहेत. 

रोज कोरोना योद्धाचे चोखपणे काम करणारे विविध खात्यातील अधिकारी, कर्मचारी हे कोरोनाचे शिकार होत असून त्यांनाही योग्यवेळी, योग्य उपचार आणि आराम मिळणे गरजेचे आहे. त्यांच्याकडे कानाडोळा झाला तर कोरोना बाधित होत असलेल्या सर्वसामान्यांचे हालही कुणीही खाणार नाही हेही तितकेच खरे आहे.