दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
दौंड शहर व परिसरातील कोरोनाचा प्रसार थांबायचे नाव घेईना असे चित्र या ठिकाणी आहे. रोज बाधित रुग्णांची संख्या वाढते आहे.
लोकवस्ती सह येथील तहसील कार्यालय, तालुका आरोग्य विभाग, बँका तसेच उपजिल्हा रुग्णालयात सुद्धा कोरोनाचा शिरकाव झालेला आहे, आणि आज तर कोरोनाने पुन्हा एकदा नगरपालिकेतील सफाई विभागात एन्ट्री केल्याने येथील सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दि.24 रोजी उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने शहर व परिसरातील 66 संशयितांची कोरोना तपासणी करण्यात आली, त्यापैकी 9 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून येथील सम्राट नगर येथे राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांना कोरोना संसर्गाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
22 ते 65 वर्ष वयोगटातील 2 महिला व 7 पुरुष रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. शहरातील 7 तसेच ग्रामीण भागातील 2 रुग्णांना संसर्गाची बाधा झाली असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ संग्राम डांगे यांनी दिली आहे.