दौंड : सहकारनामा
दौंड उपजिल्हा रुग्णालयामध्ये सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा सर्वांनी लाभ घेऊन स्वतःला कोरोना महामारी पासून सुरक्षित ठेवावे असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी केले आहे. सध्या दौंड शहर व परिसरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या रोज वाढत आहे त्या पार्श्वभूमीवर डॉ. डांगे यांनी हे आवाहन केले आहे. लसीकरण हेच कोरोना विरोधातील महत्त्वाचे शस्त्र असून दौंड करांनी त्याचा फायदा घ्यायला हवा असेही डॉ. डांगे यांनी सांगितले आहे.
सरकारी कर्मचारी, राज्य राखीव पोलीस,पोलीस कर्मचारी, तसेच सरकारी दवाखान्यातील कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी यांचे लसीकरण झालेले आहे, सध्या वय वर्ष साठ पुढील ज्येष्ठांचे लसीकरण सुरू आहे. तसेच 45 ते 59 वर्ष वयाच्या परंतु जुने आजार असलेल्या नागरिकांचेही लसीकरण करण्यात येत आहे.
येथील उपजिल्हा रुग्णालयात संपूर्ण दिवस लसीकरण सेवा दिली जात आहे आणि त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही त्यामुळे अशा नागरिकांनी लवकरात लवकर या लसीकरणाचा लाभ घ्यावा व महामारी पासून दूर राहावे असेही आवाहन डॉ. संग्राम डांगे यांनी केले आहे.
शहरातील अधिग्रहित केलेल्या योगेश्वरी,महालक्ष्मी तसेच पिरॅमिड या खाजगी दवाखान्यात सुद्धा लसीकरण सेवा सुरू करण्यात आलेली आहे. या दवाखान्यांमध्ये लसीकरणासाठी 250 रु. शुल्क द्यावे लागणार आहेत.