Corona Update – दौंड शहरातील धक्कादायक प्रकार, कोरोना बाधित रुग्णांची माहितीच येत नाही समोर! प्रशासनाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता



दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)

कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील शहरातील काही मंडळी आपली कोरोना तपासणी खाजगी प्रयोगशाळेत करीत आहेत, व त्या पैकी रोज सरासरी 5 ते 7 जणांचा अहवाल हा पॉझिटिव्ह येत आहे.

परंतु या बाधित रुग्णांची  नोंद उपजिल्हा रुग्णालय अथवा दौंड नगरपालिकेकडे आढळून येत नाही अशी धक्कादायक माहिती शहरातील खुद्द एका डॉक्टरनेच सहकारनामा ला दिली आहे. 

याबाबत नगरपालिकेतील अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले की असा प्रकार होणे शक्य आहे, खाजगी प्रयोग शाळेने अशा पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती नगरपालिका किंवा उपजिल्हा रुग्णालयाला कळविणे बंधनकारक आहे मात्र ते कळवीत नाहीत हे खरे आहे. शहरात जर असा प्रकार होत असेल तर येथील प्रशासनाने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. सध्या शहरातून कोरोना बाधित रुग्ण सापडण्याची संख्या अत्यंत घटली आहे व संसर्ग आटोक्यात येण्याची  लक्षणे दिसत आहे. मात्र अशा धक्कादायक प्रकाराने शहरात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू शकतो व ते दौंडकरांसाठी मोठे घातक आहे व प्रशासनासाठीही मोठी डोकेदुखी होईल. 

त्यामुळे अशा बाधित रुग्णांची नावे प्रशासनाला कळाली नाही तर त्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना कसे व कोणी शोधायचे असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. या संतापजनक प्रकाराची प्रशासनाने त्वरित शहानिशा करावी व बाधित रुग्णांची ची नावे प्रशासनाला न देणाऱ्या खाजगी प्रयोग शाळेवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी होत आहे.