Corona Upadate : दौंड शहरामध्ये 5 जण कोरोना पॉझिटिव्ह ! मात्र तरीही दौंडकरांना दिलासा, वाचा यामागील कारण



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तरकाझी) 

कोरोनाने मागील दोन दिवसांपासून दौंडकरांना दिलासा दिला आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कातील बहुतांची तपासणी केली असता त्यांचे अहवाल निगेटिव्ह येत आहेत, व ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत त्यापैकी ही बहुतांशी लोकांना संसर्गाची सौम्य लक्षण आढळत आहेत.

दि.४ रोजी उपजिल्हा रुग्णालयाने शहर व परिसरातील ७२ संशयितांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविले होते, आज रोजी त्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. ७२पैकी फक्त पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ६१ जणांना दिलासा मिळाला आहे. १४ ते ५८ वयोगटातील एक पुरुष व चार महिलांना नव्याने कोरोना ची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे, शहरातील गांधी चौक,चंद्रभागा नगर,तसेच गोपलवाडी परिसरातील रुग्णांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली आहे.तसेच ६ जणांचा अहवाल प्रलंबित आहे.

दौंड शहर कोरोना मुक्त व्हावे यादृष्टीने येथील उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका व पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे, व प्रशासनाच्या या प्रयत्नांना सध्या यशही मिळत असल्याचे दिसत आहे. दौंड करांनी आणखीन थोडी सावधानता बाळगत प्रशासनाला सहकार्य केले तर शहर लवकरच कोरोना मुक्ता होईल अशी स्थिती आहे. सध्या प्रत्येक घरात गरम पाण्याची वाफ घेणे, गरम पाणी पिणे, प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून आयुर्वेदिक काढा पिणे आदी उपाय केले जात आहेत. शहरातील संसर्ग रोखण्यास याची मदत होत असल्याचे दिसत आहे.