कोरोना’च्या तिसऱ्या लाटेला हलक्यात घेऊ नका, सतर्कता बाळगा – डॉ. संग्राम डांगे यांचे आवाहन

दौंड : सध्या कोरोना महामारी ने( तिसरी लाट) पुन्हा एकदा डोके वर काढले असल्याचे चित्र सर्वत्र दिसू लागले आहे. राज्यातील मोठ्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना आता ग्रामीण भागांमध्येही प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. कोरोना काळात प्रशासनाने दिलेल्या नियमांची व उपाययोजनांची अंमलबजावणी करणे नागरिकांनी थांबविल्याने परिस्थिती पुन्हा एकदा गंभीरतेच्या दिशेने चालली असल्याचे दिसू लागल्याने दौंडकर नागरिकांनी कोरोना ला हलक्यात न घेता वेळीच सतर्कता बाळगावी तसेच कोरोना नियमांचे पालन करावे व प्रत्येकाने आपले लसीकरण करून घ्यावे असे आवाहन येथील उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी केले आहे.दि.11 जानेवारी रोजी उपजिल्हा रुग्णालयामध्ये शहरातील 77 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यापैकी 6 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने दौंड शहरातही कोरोना ने पुन्हा शिरकाव केला असल्याची माहिती डांगे यांनी दिली.
कोरोना ची तिसरी लाट आलेली दिसत असताना नागरिक कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्याचा फटका आपल्यालाच सहन करावा लागणार आहे हे नागरिकांनी विसरू नये. सध्या बाधित रुग्णांमध्ये कोरोना ची लक्षणे सौम्य दिसत असली तरी नागरिकांनी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, परिस्थिती कधीही पालटू शकते हे विसरून चालणार नाही. सध्या मास्क, सॅनिटायझर चा वापर फारच कमी झालेला दिसतो आहे, हे धोकादायक ठरू शकते त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क वापरलाच पाहिजे म्हणून प्रशासनाकडून कडक पावले उचलली जात आहेत. कोरोना च्या पहिल्या, दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांना एक -एक खाट मिळविण्यासाठी साठी भटकावे लागत होते, कोरोना बाबत नागरिकांनी वेळीच सतर्कता बाळगली नाही तर तीच वेळ पुन्हा येण्यास जास्त वाट पहावी लागणार नाही अशा परिस्थितीला सुरुवात झाली आहे हे रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सिद्ध होत आहे, हे नागरिकांनी लक्षात घ्यावे असे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे.