Corona Iffect – दौंड कोविड सेन्टर हाऊसफुल होण्याच्या मार्गावर, शहरातील खाजगी दवाखाने ताब्यात घ्या : दौंडकरांची मागणी



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

करोना महामारीला सुरुवात झाल्यापासून तब्बल चार  महिने शहरी व ग्रामीण भागात लॉक डाउन लागू करण्यात आला परंतु या संसर्गाचा प्रसार आटोक्यात आला नाही, उलट दिवसें दिवस बाधित रुग्णांच्या या संख्येत वाढ होतच आहे आणि हीच अवस्था दौंड शहराची सुद्धा झाली  आहे.

वाढत्या बाधित रुग्णां मुळे येथील कोविड सेंटर फुल होण्याच्या स्थितीत आहे, त्यामुळे येथील  रुग्णांच्या उपचारासाठी खाजगी दवाखाने ताब्यात घ्यावीत अशी मागणी दौंडकर करीत आहेत.दि.२२जुलै पर्यंत तब्बल 76 बाधित रुग्ण येथील कोविड सेन्टरला उपचार घेत आहेत, जवळपास हीच परिस्थिती ग्रामीण भागात  सुद्धा दिसते आहे.

दि.२१ जुलै रोजी आलेल्या शहरातील बाधित रुग्णांच्या अहवालाने तर सर्वांचीच झोप उडविली आहे. बाधित  रुग्णांच्या संपर्कातील १०९ जणांपैकी फक्त शहरातील १९ जणांना करोना ची बाधा  झाल्याचा अहवाल आला आहे आणि हा अहवाल प्रशासन, दौंड करांनी गंभीर विचार करणाराच आहे. 

या परिस्थितीला नेमके  कोण जबाबदार आहे? याच्यावर वाद घालण्या पेक्षा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाला येथील सर्व पक्ष,संघटनांनी सहकार्य करण्याची गरज आहे. या पुढे तरी शहरात कोणत्या फायदेशीर उपाय योजनांची अंमलबजावणी केली पाहिजे याच्यावर विचार केला पाहिजे. त्यासाठी प्रशासन आणि येथील सर्व पक्ष,संघटना, नगरसेवकांनी एकत्र येत एका विचाराने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. शहरातील फक्त लॉक डाऊन वाढवत राहणे हा संसर्ग रोखण्याचा एकच पर्याय राहिलेला नाही हे वाढत्या बाधित रुग्ण संख्येमुळे स्पष्ट झाले आहे.

शहरातील  बाधित रुग्णांची संख्या रोज वाढतच आहे, त्यामुळे येथील कोविड सेंटर हाउसफुल होण्याच्या मार्गावर आहे, त्यातच कोविड सेंटर मध्ये व्हेंटिलेटर नसल्या मुळे येथील रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. शहरातील खाजगी दवाखान्यांमध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध असून सुद्धा त्यांचा बाधित रुग्णांच्या उपचारासाठी अत्यंत गरज असताना ही उपयोग का झाला नाही? तसेच खाजगी दवाखान्यातील व्हेंटिलेटर वेळप्रसंगी उपलब्ध व्हावेत यासाठी प्रशासनाने काय निर्णय घेणे अपेक्षित आहे.

यावर विचार करणे गरजेचे झाले आहे. पुण्यातील खाजगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांना उपचार  दिले जात आहेत, मग दौंड मधील खाजगी रुग्णालयामध्ये असे उपचार का दिले जात नाहीत? पुण्यातील  खाजगी रुग्णालयातील  ८०% बेड्स प्रशासनाने ताब्यात घेतले आहेत हा निर्णय दौंड मध्ये का घेतला जात नाही, या महामारी च्या काळात रुग्णालयांबाबतचे सर्व  अधिकार प्रशासनाकडे आहेत या अधिकारांचा वापर दौंडमध्ये कधी होणार असे प्रश्न अनुत्तरीत राहत आहे