दौंडकरांनो (Corona) ‛कोरोना’ होऊ नये हाच पर्याय निवडा, आरोग्याची काळजी घ्या..



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

सण, उत्सव साजरे करताना नागरिकांनी गाफील राहूनये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. गणेशोत्सव साजरा करताना गर्दी होणार नाही व शहरात संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासनासह नागरिकांनी सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. गर्दी केल्यास आपल्यालाच मोठ्या धोक्याला सामोरे जावे लागणार आहे, हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. 

शहरातील वाढत्या रुग्ण संख्येमुळे येथील प्रशासनावरील ताण वाढतो आहे.उपजिल्हा रुग्णालयातील गंभीर रुग्णांसाठी असणारे व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड फुल झालेले आहेत. त्यामुळे यापुढे गंभीर रुग्णांना नाईलाजास्तव  उपचारांसाठी अन्यत्र पाठवावे लागणार आहे, ज्यामुळे रुग्णाच्या कुटुंबाला मनस्ताप व जास्तीचा खर्च सोसावा लागणार हे सुद्धा सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे कोरोना होऊ न देणे हाच पर्याय सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून सतर्क राहणेच गरजेचे झाले आहे.

 गणेशोत्सव -मोहरमच्या पार्श्वभूमीवर दौंडकरांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. कोरोना संसर्गाची लक्षण दिसत असल्यास गाफील न राहता त्वरित येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. स्वतःला, कुटुंबाला व आपल्या मित्र परिवाराला कोरोना महामारीपासून संरक्षण देण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या उपाय योजनांची अंमलबजावणी करावी, ही “सहकारनामा”च्या वतीने दौंडकरांना विशेष विनंती आहे.