जलसंपदा विभागाचा सावळा गोंधळ | बोगस सही शिक्के प्रकरणात रावसाहेबांच्या चौकशीचे आदेश, जमीन सपाटीकरण कामातील गैरव्यवहार

सुधीर गोखले

सांगली : पोखर्णी (ता.वाळवा) येथील चांदोली अभयारण्यातील झोळंबी वसाहतीमधील वन विभागाच्या जमिनीच्या सपाटीकरणाच्या कामाची अंदाजपत्रकीय मान्यता पत्रे जलसंपदा विभागाने बनावट सही शिक्क्यानिशी ठेकेदाराला दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने जलसंपदा विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. या निमित्ताने जलसंपदा विभागातील रावसाहेबांचे कारनामे उघडकीस आले आहेत. या साऱ्या प्रकरणी ठपका असलेले असिफ इनामदार यांच्या चौकशीसाठी वारणा डावा तिर कालवा उपविभाग क्रमांक एक चे सहायक अभियंता ए.आर लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना ७ जून पर्यंत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

पोखर्णी (ता.वाळवा) येथे चांदोली अभयारण्याच्या झोळंबी वसाहतीचे पुनर्वसन करण्यात आले आहे. येथील डोंगराळ जमिनीच्या सपाटीकरणाच्या कामाचे अंदाज पत्रक वारणा पाटबंधारे विभागाकडून केले  जाते. वनक्षेत्रपालांनी कामाच्या तांत्रिक मंजुरीसाठी वारणा कालव्याच्या कार्यकारी अभियंत्यांना प्रस्ताव पाठवला. त्यानंतर कार्यकारी अभियंता वारणा कालवे क्र. एक इस्लामपूर यांच्या सही शिक्क्यानिशी मंजुरी पत्रे शिराळा वनक्षेत्रपाल यांच्याकडे जमा झाली. हि कागदपत्रे उपवनसंरक्षक कार्यालयाकडे प्रशासकीय मंजुरीसाठी पाठवली. पुढे कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याने निविदा प्रक्रिया राबवली गेली नाही.

शासकीय निधी अभावी हि कामे केली नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान उपवन संरक्षक यांचेकडे संबंधित कामासाठी बनावट कागदपत्रे तयार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवरून वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र वनक्षेत्रपाल यांचेकडे सादर केलेली कागदपत्रेच बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्राथमिक तपासात जलसंपदा विभागाकडील लिपिक असिफ इनामदार हे दोषी आढळून आले आहेत.

असिफ इनामदार यांच्याबाबत वनक्षेत्रपाल सचिन जाधव यांनी सर्व माहिती व पोलीस तपासाबाबतची कागदपत्रे मला इ मेल द्वारे पाठवली आहेत. तसेच वनविभागाकडूनही त्यांची कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. याबाबत शहानिशा करून योग्य कारवाई करू

डी.डी. शिंदे – कार्यकारी अभियंता , वारणा पाटबंधारे विभाग, इस्लामपूर

असिफ जमादार यांच्याबाबत पुराव्यासह जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव दीपक कपूर व कार्यकारी अभियंता डी .डी शिंदे याना कळवले आहे. जमादार यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. संबंधित दोषी व्यक्ती काही तासात निवृत्त होत आहेत त्यामुळे त्यांना सेवानिवृत्ती नंतरचे कोणतेही लाभ मिळू नयेत अशी आपण मागणी केली आहे.

सचिन जाधव – वनक्षेत्रपाल