मुंबई : सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट आमदार राहुल सुभाष कुल यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या सदस्यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा सखोल पाहणी दौरा केला. या विमानतळाद्वारे देशांतर्गत विमान वाहतूक सेवा लवकरच सुरू होणार असून त्यानंतर आंतरराष्ट्रीय सेवा सुरू करण्याचे विमान प्राधिकरणाचे नियोजन आहे.

या विमानतळ पाहणी दौऱ्यासाठी सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य आणि आमदार सर्वश्री मिलिंद नार्वेकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार भिमराव तापकीर, आमदार संभाजीराव कोहळीकर, आमदार वरुण सरदेसाई, आमदार संजय पोतनीस, हेमंत ओगले, आमदार निरंजन डावखरे, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार शिवाजीराव गर्जे, आमदार रईस शेख, आमदार धर्मरावबाबा अत्राम तसेच आमदार विलास भुमरे हे उपस्थित होते.

आमदार ॲड.राहूल कुल यांच्या अध्यक्षतेखाली या समितीच्या वतीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विविध विभागांची सखोल पाहणी करण्यात आली तसेच विमानतळावरील विविध सुविधा जसे, टर्मिनल, रनवे, पार्किंग, स्वच्छता, विद्युत पुरवठा, विमानतळावर आणि कर्मचारी कॉलनीसाठी पाण्याची उपलब्धता व व्यवस्था, सुरक्षा कर्मचाऱ्यांची तैनाती, सीसीटीव्ही, आणीबाणीची तयारी, प्रवाशांच्या सोयीसुविधा ज्यामध्ये प्रतीक्षागृह, जेवणाची सोय, वायफाय, शौचालय, इमारतींमधील सुगमता आणि कर्मचारी वर्गासाठी आवश्यक सेवा ज्यामध्ये कर्मचारी कॉलनी, आरोग्य सुविधा, वाहतूक इत्यादीची पाहणी करण्यात आली. यावेळी समितीने संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरचे निरीक्षण करून प्रवाशांच्या सुरक्षितता, सुविधा आणि कर्मचारी कार्यक्षमतेसाठी आवश्यक सुधारणा सुचवल्या.

सार्वजनिक उपक्रम समितीच्या पाहणी दौऱ्यावेळी सिडकोचे वरिष्ठ अधिकारी श्री. विजय सिंघल (उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको) -श्री. शान्तनु गोयल, (सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको)- डॉ. राजा दयानिधी (सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको) श्री. गणेश देशमुख, (सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको) श्री. सुरेश मेंगडे, (मुख्य दक्षता अधिकारी, सिडको) हे आवर्जून उपस्थित होते.

यावेळी सिडकोच्या अधिकाऱ्यांनी विमानतळाच्या व्यवस्थेबाबत समितीला सविस्तर माहिती दिली. त्यावेळी सार्वजनिक उपक्रम समितीने प्रवाशांच्या सुरक्षितता आणि सोयीसुविधा यांना प्राधान्य देत आवश्यक सुधारणा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. समितीच्या पाहणी दौऱ्यामध्ये समितीकडून अधिकाऱ्यांना ज्या सुचना करण्यात आल्या आणि जे उपाय सुचविण्यात आले त्यामुळे या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना तसेच कर्मचारी वर्गाला उत्कृष्ट, सुरक्षित आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होण्यासाठी मदत मिळणार आहे.

असा आहे हा प्रकल्प – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा मुंबईजवळील कोपर-पनवेल भागात उभारला जाणारा ग्रीनफिल्ड विमानतळ आहे. हा प्रकल्प सिडको (महाराष्ट्र सरकार) तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि अदानी समूह यांच्या संयुक्त भागीदारीत उभारला जात आहे.