Co Vaccine : दौंड तालुक्यात ‛कोरोना’वरील लसीचा मोठा ‛तुटवडा’! आयोजकांवर लसीकरण ‛कॅम्प रद्द’ करण्याची वेळ



– सहकारनामा

दौंड : सध्या सम्पूर्ण देशात, आणि राज्यात लसीकरण सुरू आहे. याला अपवाद पुणे जिल्हा आणि त्याचे तालुकेही नाहीत. अगोदर या लसीकरणाला लोकांचा हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता याला दौंड तालुकाही अपवाद नव्हता  मात्र आता लोकांच्यामध्ये लसीकरणाबाबत असलेली भीती नष्ट झाल्याने त्यास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. मात्र हे होत असताना आता लस उपलब्ध होत नसल्याने त्याचा तुटवडा जाणवू लागला आहे.

दौंड तालुक्यामध्ये विविध भागांत लसीकरणासाठी कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये लोकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे, मात्र कालपासून संपुर्ण तालुक्यात लसीचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे आणि आज तर तालुक्यात कुठेच लस उपलब्ध नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे साहजिकच लस घेण्यासाठी दूरवरून येणाऱ्या लोकांना पुन्हा आपल्या घरचा रस्ता धरावा लागत आहे.

लसीचा तुटवडा होत आल्याबाबत दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेखा पोळ मॅडम यांच्याशी बातचीत झाली असता त्यांनी माहिती देताना, कालपर्यंत तालुक्यातील जवळपास सर्व लसीकरण केंद्रांवरची लस संपली असल्याने आणि अजून  जिल्हा पातळीवरून आम्हाला लस उपलब्ध झाली नसल्याने नाईलाजाने लसीकरण थांबून कॅम्प बंद ठेवावे लागले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

राज्यात सध्या कोरोना रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामध्ये पुणे जिल्हा आणि दौंड तालुका हा आकडेवारीवरून अग्रेसर असल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना लवकरात लवकर लस उपलब्ध होऊन त्याचा लाभ मिळावा अशी मागणी नागरिकांमधूम होताना दिसत आहे.