Co-vaccine : दौंड शहरातील जिल्हा परिषदेच्या लसीकरण केंद्रावर मनमानी कारभार! तोंड पाहून लस दिली जात असल्याचा आरोप



|सहकारनामा|

दौंड : अख्तर काझी

दौंड शहरातील जिल्हा परिषदे मार्फत सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रावर भोंगळ व मनमानी पद्धतीचा कारभार सुरू असल्या बाबतची तक्रार येथील मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन यांच्या वतीने तहसीलदार व उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये लसीकरण करण्यात येत आहे परंतु या केंद्रावरील वाढत्या गर्दीमुळे जिल्हा परिषदेने दौंड पोलीस स्टेशन समोरील सरकारी दवाखान्यामध्ये लसीकरण केंद्र सुरू केले आहे. 

या केंद्रावर तोंडे पाहून नागरिकांना लस देण्याचे काम चालू आहे, त्यामुळे लसीकरणासाठी नाव नोंदणी करूनही लसीकरण केंद्रावर जाणाऱ्या नागरिकांवर अन्याय होत आहे.18 ते 44 वयोगटातील लोकांच्या लसीकरण रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये सुद्धा मोठा गोंधळ पहायला मिळतो आहे. काही नागरिकांना तर रजिस्ट्रेशन करूनही लस मिळालेली नाही परंतु अजब म्हणजे लसीकरण केंद्रावरील कर्मचारी तुमचे लसीकरण झाले आहे आता लस उपलब्ध नाही अशी उत्तरे देत आहेत. 

अशा गोंधळाच्या परिस्थिती मुळे नागरिकांना लस मिळविण्यासाठी अडचणी येत आहेत, सदरची बाब अतिशय गंभीर असून शासन यंत्रणा नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज असून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. 

तसेच शहरातील ज्येष्ठ नागरिकांना लसीचा पहिला व दुसरा डोस देण्याची व्यवस्था व्हावी अशी विनंतीही यावेळी करण्यात आली. निवेदन देते वेळी संस्थेचे पदाधिकारी भारत सरोदे व इतर सदस्य उपस्थित होते.