– सहकारनामा
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनाची अशीच परिस्थिती राहिल्यास लॉकडाउन लागू होऊ शकते असा इशारा आपल्या भाषणात दिला आहे. तसेच राजकीय पक्षांनी केवळ राजकारणापाई लोकांच्या जीवाशी खेळू नये अशा कडक शब्दांत राजकीय पक्षांचा समाचार घेतला आहे.
महाराष्ट्र राज्यात गेल्या चोवीस तासांत 47,827 इतकी कोरोनाची नवीन प्रकरणे समोर आली असल्याने कोरोना किती झपाट्याने वाढत आहे याचा अंदाज येत आहे.
मुख्यमंत्र्यांनी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात बोलताना राज्यात 24 तासांत 47,827 नवीन प्रकरणे समोर आली आहेत हे खूपच चिंताजनक असून त्यामुळे जर हा आकडा कमी झाला नाही तर मात्र लॉकडाउनचा विचार करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव वाढतच चालला असून त्यामुळे राज्यातील लोक घाबरलेल्या मनस्थितीत आहेत. कोरोनाची परिस्थिती अशीच राहिली तर मात्र लॉकडाउन लावण्यास मी नकार देऊ शकत नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
लॉकडाउनला विरोध करणाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी बोलताना काही लोक लॉकडाऊनला विरोध करीत आहेत असे म्हणत उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे नाव न घेता ‛एक उद्योगपती असे म्हणत आहेत की लॉकडाउन करण्याऐवजी सरकारने आरोग्य सुविधा सुधारण्यावर भर दिला पाहिजे’. यावर मी त्या लोकांना फक्त तुम्ही डॉक्टर व कर्मचाऱ्यांना घेऊन येण्यास सांगतो. त्यांना ते शक्य असेल तर त्यांनी हे करावे असा सांगितले.
लॉकडाउनबद्दल विचार करावाच लागेल..
महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे, 47,827 इतके नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 202 लोकांचा मृत्यू झाला आहे. 21,01,999 लोक होम क्वारंटाईन असून 19,237 विलगिकर केंद्रात आहेत. सद्यस्थितीत राज्यात सक्रीय रुग्णांची संख्या 3,89,832 आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही राज्यात निर्बंध अधिक कडक करणार आहोत आणि तरीही जर परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली तर लॉकडाउन करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण रुग्णालयांमधील सर्व बेड्स भरण्याची वाट आपण पाहू शकत नाही असे म्हणत मी राजकीय पक्षांना लोकांच्या जीवाशी खेळू नका, असे आवाहन करतो. मी नुकताच लॉकडाउन करण्याचा इशारा दिला आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर मला लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही असे त्यांनी आवर्जून नमूद केले आहे.
लॉकडाऊनला विरोधी पक्षासह राष्ट्रवादीचाही विरोध..!
असे नाही की महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाउनला फक्त भाजप विरोध करत आहे. तर महाआघाडी सरकार मधील राष्ट्रवादी कॉंग्रेस सुद्धा याविरोधात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वृत्तसंस्था एएनआय शी बोलताना सांगितले होते की, लोकांनी नियमांचे पालन केल्यास लॉकडाऊन देखील टाळता येऊ शकतो. असे म्हणताना नवाब मलिक यांनी आम्ही आणखी एक लॉकडाउन घेऊ शकत नाही, म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी इतर पर्यायांवर विचार करण्याचे आवाहन केले असल्याचे सांगितले होते.
त्याचबरोबर, विरोधी पक्ष भाजपकडूनही संपूर्ण लॉकडाऊनला विरोध केला जात असून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोरोना संकटावर अंकुश ठेवण्यासाठी आता लॉकडाउन हा उपाय नाही असे सांगितले होते, शिवाय लॉकडाउन ला भाजपच नाही तर प्रत्येक सामान्य माणूस, व्यापारी या प्रकारच्या कोणत्याही निर्णयाला विरोध करतील असे नमूद केले होते.
राजकीय नेत्यांव्यतिरिक्त महिंद्रा ग्रुपच्या आनंद महिंद्रा यांनीही लॉकडाऊनला विरोध केला होता आणि त्यांनी ट्विटमध्ये आता वैद्यकीय सुविधा वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, जेणेकरून विषाणू पासून बचाव होऊ शकेल. कारण मजूर-छोट्या व्यवसायासाठी आणखी एक लॉकडाउन धोकादायक असेल असे त्यांनी म्हटले होते.