पुणे : दौंड, हवेली व इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील अनेक पर्यटक सध्या जम्मू – काश्मीरमध्ये अडकलेले आहेत. त्यांच्या परिवारांमध्ये चिंतेचं वातावरण असून, त्यांना सुरक्षितरित्या परत आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जम्मू – काश्मीर प्रशासन व संबंधित यंत्रणांशी संपर्क साधावा व आवश्यक कार्यवाही करावी अशी विनंती दौंडचे आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना केली होती.
आमदार राहुल कुल यांनी मागणी केल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे विशेष चार्टर विमानाची व्यवस्था करण्यात आली. या तातडीच्या निर्णयामुळे ८३ नागरिक सुखरूपपणे मुंबईत परत येऊ शकणार आहेत.
८३ पैकी ७१ नागरिक दौंड व हवेली तालुक्यातील असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सहकार्यामुळे आणि तत्परतेमुळे हे शक्य झाले असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी देऊन, महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे आणि आज त्यांनी हे सिद्ध केले त्यामुळे आपण त्यांना मनःपूर्वक धन्यवाद देतो असे आमदार कुल यांनी म्हटले आहे.

