Close private clinics in Daund : कोरोना बाधित रुग्णांना उपचार नाकारणारे दौंडमधील खाजगी दवाखाने बंद करा, वैशाली नागवडे



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तत्काळ नियंत्रण करणेकरीता जिल्ह्यातील खाजगी दवाखाने विलगीकरणासाठी पूर्णतः किंवा आवश्यकतेनुसार खाटांची व्यवस्था वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांचे सेवेसहित अधीगृहीत करण्यात आली आहेत. 

याच अनुषंगाने दौंड शहरातील सुद्धा तीन खाजगी दवाखाने प्रशासनाने ताब्यात घेतली आहेत. परंतु या पैकी दोन दवाखाने  कोरोना बाधित रुग्णांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शवित असल्याचे निदर्शनास आल्याने महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे यांनी याविरोधात आवाज उठविला आहे.

नागवडे यांनी दौंड- पुरंदरचे उपविभागीय दंडाधिकारी तथा Incident Commander यांची भेट घेत या दवाखान्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. 

शासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा कोरोना बाधित रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या व प्रशासनाचा आदेश धुडकवणाऱ्या या दोन दवाखान्यांना व त्यांच्या प्रमुखांना पाठीशी न घालता कोविड-१९ साथरोग अधी नियमांतर्गत कारवाई करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना स्टाईलने आंदोलन करेल असा इशाराही वैशाली नागवडे यांनी दिला आहे.

दौंड मधील कोविड सेंटर मध्ये उपचार घेणाऱ्या एका कोरोना बाधित रुग्णास दि.२४ जुलै रोजी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तेथे उपस्थित असलेले वैद्यकीय अधिकारी यांनी आपले स्तरावरून कोविड-१९ रुग्णांकरिता अधिग्रहित केलेल्या तीन रुग्णालया पैकी एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यास पाठविले असता त्या रूग्णालयाच्या प्रमुखांनी सदर रुग्णास दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शविली, त्यामुळे रुग्णाच्या मुलाने उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांना सदरील घटनेची माहिती दिली. 

यानंतर डॉ.डांगे यांनी तत्काळ प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या शालिमार चौक येथील दुसऱ्या खाजगी दवाखान्यामध्ये त्या गंभीर रुग्णास दाखल केले. अत्यवस्थ बाधित रुग्णास उपचारासाठी दाखल करून न घेणाऱ्या या खाजगी दवाखान्याची बाब माहितीस्तव व पुढील कार्यवाही स्तव डॉ. डांगे यांनी दौंड- पुरंदरचे उपविभागीय दंडाधिकारी यांना पाठविली आहे.

या घटनेची संपूर्ण शहरात चर्चा होत असून संताप व्यक्त केला जात आहे व  अशा दवाखान्या वर कडक कारवाईची मागणी होत आहे.

कोरोना बाधित रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या या खाजगी दवाखाने व त्यांच्या प्रमुखानं विषयी बोलताना नागवडे म्हणाल्या, दौंड शहरातील प्रशासनाने ताब्यात घेण्यात आलेल्या या दवाखान्यांनी कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करावेत असा आदेश देऊन पाच दिवसांपेक्षा जास्त वेळ झाला आहे तरी हे  दवाखाने शासनाचे आदेश धुडकावत आहेत. कोविड-१९ साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जर हे खाजगी दवाखाने प्रशासनाला जुमानत नसतील तर त्यांचे दवाखाने शासनाने बंद करावेत व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. डॉक्टर्स देव आहेत, त्यांनी देवा सारखेच वागले पाहिजे असा  सल्ला सुद्धा नागवडे यांनी या  खाजगी दवाखान्यांच्या बेजबाबदार प्रमुखांना दिला आहे. शासनाच्या ताब्यातील खाजगी दवाखान्याने जर कोरोना बाधित रुग्णावर उपचार केले नाही तर अशा दवाखान्याच्या प्रमुखांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे ही वैशाली नागवडे यांनी सांगितले.