अख्तर काझी
दौंड : हॉर्न दिला नाही… अशा किरकोळ कारणावरून पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारातच दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, दौंड चे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी कायद्याविषयी मार्गदर्शनासाठी येथील पोलीस अधिकारी, पोलीस पाटील, पत्रकार यांच्यासाठी पोलीस स्टेशन येथे बैठक आयोजित केली होती. सदरच्या बैठकीला पोलीस अधिकाऱ्यांसह सर्वच हजर असताना सर्वांच्या समोरच हाणामारीची घटना घडली.
पोलिस, मीडिया, पत्रकार आणि पोलीस पाटलांसमोरच ही घटना घडल्याने संतापलेल्या पोलीस प्रशासनाने स्वतः फिर्यादी होत हाणामारी करणाऱ्या व शांततेचा भंग करून गोंधळ घालणाऱ्या दोन्ही गटातील युवकांवर भारतीय न्याय संहिता कलम 192(2),115(2),351(2),352, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110,112,117 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सोमेश सुधाकर चितारे, विश्वजीत दीपक चितारे, अक्षय भरत चितारे, प्रज्वल राम बनसोडे, राम हनुमंत बनसोडे (सर्व रा. जगदाळे वस्ती ,दौंड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सदरची घटना, दि.12 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 च्या दरम्यान दौंड पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारात घडली. कायदेविषयक मार्गदर्शनासाठीच्या, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी बोलाविलेल्या बैठकीसाठी येथील सर्व पोलीस अधिकारी ,पोलीस पाटील, पत्रकार पोलीस स्टेशन आवारात उपस्थित होते.
यावेळी पोलीस स्टेशन प्रवेशद्वारासमोर दोन गटात गोंधळ होताना दिसला, त्यामुळे उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तेथे जाऊन वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही गटातील युवक पोलिसांसमोरच एकमेकांना मारहाण करू लागले. शिवीगाळ करीत, आरडाओरडा करून त्यांनी सार्वजनिक शांततेचा भंग केला. पोलिसांनी मध्यस्थी करीत दोन्ही गटातील युवकांना पोलीस स्टेशनला आणले व भांडणाचे कारण विचारले असता, जगदाळे वस्ती येथे मोटरसायकलने हॉर्न दिला नाही या कारणावरून वाद झाला असे त्यांनी सांगितले. वाद झाल्याने दोन्ही गट तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला समोरासमोर आले व पुन्हा त्यांच्यात वाद सुरू झाल्याने हाणामारीचे घटना घडली. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार घाडगे करीत आहेत.
दौंड शहरासह इतर शहरातील सुद्धा युवा वर्गाची पावले गुन्हेगारी क्षेत्राकडे वळू लागलेली आहेत. त्यांना कायद्याविषयी व गुन्हा दाखल झाल्यानंतर कुटुंबावर होणाऱ्या परिणामाविषयी माहिती नसल्याने कायद्याचा त्यांना धाकच राहिलेला नाही. एखाद्या भाईला आदर्श मानून भाईगिरी व टवाळखोरी करण्यात त्यांना मजा वाटू लागली आहे. गुन्हे दाखल झालेल्या युवकांना कुठेही नोकरी मिळत नाही, त्यामुळे ते अवैध मार्गाने पैसे कमविण्याचे मार्ग पत्करतात याचे परिणाम त्यांच्या कुटुंबीयांना भोगावे लागत आहेत. त्यामुळे येथील सामाजिक संस्थांनी, पक्ष ,संघटनांनी अन्नदान, रक्तदान या सामाजिक उपक्रमा सोबतच सध्याच्या युवा वर्गासाठी कायदेविषयी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत व गुन्हेगारी क्षेत्राकडे वळणाऱ्या युवकांना गुन्हेगारी क्षेत्रापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करावा अशी पालकांची अपेक्षा आहे. पोलीस स्टेशन समोरच हाणामारीची घटना घडल्याने, दौंड शहरात कायद्या विषयक मार्गदर्शन नक्की कोणाला करावे असा प्रश्न येथील पोलीस प्रशासनाला पडला असणार आहे.