रेल्वे प्रशासनाने रस्ता अडविल्याने केडगावच्या नागरिकांची पोलीस ठाण्यात तक्रार

केडगाव (दौंड) : केडगाव – यवत दरम्यान असणारा १०० वर्षे जुना वहिवाटीचा रस्ता रेल्वे प्रशासनाने बंद केल्याने केडगाव येथील विठ्ठल रंगनाथ शेळके यांनी या परिसरातील नागरिकांसह रेल्वे
प्रशासनाविरोधात यवत पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

याबाबत विठ्ठल (नाना) रंगनाथ शेळके यांनी माहिती देताना, केडगाव स्टेशन ते खुटबाव रेल्वे स्टेशन दरम्यान, गोडसे मळा लगत वस्तीकडे
जाणारा तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणारा हा एक महत्वाचा रस्ता आहे जो हा गेल्या सुमारे १०० वर्षांपासून ग्रामस्थ, शेतकरी व नागरिक यांच्या नियमित वापरात आहे. उस, कांदा, शेतीमाल, जनावरांचा चारा
तसेच दैनंदिन ये-जा करण्यासाठी हा रस्ता प्रामुख्याने वापरला जातो असे विठ्ठल रंगनाथ शेळके यांनी आपल्या तक्रारी अर्जात म्हटले असून दौंड-पुणे रेल्वे मार्गातील केडगाव – यवत स्थानकादरम्यान केडगाव – पाटील निंबाळकर वस्ती येथील हा रस्ता मुख्यमंत्री
योजनेतून विकसित सडक करण्यात आलेला असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

या रस्त्याद्वारे दौंड तालुक्यातील पश्चिम भागातील अनेक गावे केडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीशी जोडली जातात. असंख्य शेतकरी, नागरिक, कर्मचारी, याच रस्त्याचा वापर करीत असतात. विशेष म्हणजे या ठिकाणी रेल्वे अस्तित्वात येण्यापूर्वीपासून हा रस्ता सार्वजनिक वहिवाटीसाठी वापरात आहे असे त्यांनी सांगत रेल्वे प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता व कायदेशीर पर्यायी व्यवस्था न करता सदर रस्त्यावर बॅरिकेट्स लावून
रस्ता पूर्णपणे बंद केला असल्याने हजारो नागरिक व शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून दैनंदिन जीवन, शेती व्यवसाय व वाहतुकीवर गंभीर परिणाम झाला आहे.

रेल्वे प्रशासनाची ही कृती बेकायदेशीर, मनमानी व जनतेच्या मूलभूत हाक्कांवर घाला घालणारी आहे त्यामुळे सदर रस्ता तात्काळ नागरिक व शेतकऱ्यांसाठी खुला करून देण्याबाबत योग्य ती कारवाई करावी असे तक्रारी अर्जात नमूद करण्यात आले असून जर असे केले गेले नाही तर भारतीय रेल्वे कायदा १९८९ चे कलम १८ (ब) अन्वये संबंधित रेल्वे प्रशासनावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी विठ्ठल रंगनाथ शेळके यांनी या अर्जाद्वारे केली आहे.