मुंबई : शेतकरी बांधवांनो आत्महत्या करू नका. आसमानी संकट, सावकारी दुष्टचक्र यातून तुम्हाला बाहेर काढण्यास मी कटिबद्ध आहे. तुम्हाला छत्रपतींची शप्पथ आहे. आत्मघातात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचं लखलखतं यश सामावलेलं असतं, अशी भावनिक साद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत शेतकऱ्यांना घातली आहे.
मी आणि माझं सरकार सतत २४ तास तुमच्यासाठी तुमच्या सोबत आहे, याची खात्री बाळगा… जीव देणं बंद करूयात, जीव लावूयात एकमेकांना… चला, नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधूयात आणि आपण मिळून हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया! असे आवाहन यावेळी एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ या चक्रव्युहातून सध्या राज्यातील शेतकरी जात आहे. अनेकवेळा डोक्यावर असलेले पतसंस्था, बँकांचे कर्ज आणि बिगरशेती म्हणवणाऱ्या पतसंस्थान्नी मॉर्गेज करून घेतलेली शेती आणि त्यातून होणारी शेतकऱ्याची पिळवणूक यामुळे शेतकरी आत्महत्येसारखे पाऊल उचलण्यास मजबूर होतो.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावनिक सादानंतर काही शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडताना, एकतर शेती मालाला भाव मिळत नाही आणि त्यातच जर अस्मानी संकट ओढवलेतर मग मात्र शेतकऱ्यासमोर अंधार दाटून येतो. याला त्याला भीक मागण्यापेक्षा आणि बँकांच्या धमक्या ऐकण्यापेक्षा तो थेट स्वतःचे जीवनच संपवून टाकतो. या सर्व जाचातून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची सुटका करावी अशी इच्छा हे शेतकरी बोलून दाखवत आहेत.