अख्तर काझी
दौंड : तमाम भारतीयांचे आराध्य दैवत राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा दौंडकर शिवप्रेमींनी मोठ्या जल्लोषात साजरा केला. अखिल भारतीय मराठा महासंघ व दौंड शहर व तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने शिवजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
जयंतीनिमित्ताने आयोजकांच्या वतीने दवंडी रथ, शिवकालीन शस्त्र प्रदर्शन, रक्तगट व मधुमेह तपासणी शिबिर, शिवकालीन वेशभूषा स्पर्धा, घरोघरी शिवजन्मोत्सव देखावा स्पर्धा, शिवजन्म सोहळा, मर्दानी खेळ, अंतर शालेय शिवकालीन जिवंत देखावा व चित्ररथ स्पर्धात्मक शोभायात्रा आदी उपक्रम राबविण्यात आले.
दि.19 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रा मध्ये, शिवजयंती निमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महिलांनी पाळणा गायला. यामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी होत्या. शिवजन्म सोहळ्यानंतर दौंड चे तहसीलदार अरुण शेलार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजय कावळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांच्यासह शहरातील विविध पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण केले.
सायंकाळच्या सत्रा मध्ये, शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी साकारलेले शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग असलेले चित्ररथ व शिवकालीन जिवंत देखावा शोभायात्रा काढण्यात आली.
शोभायात्रेची सांगता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये करण्यात आली. या वेळी जिवंत देखाव्यांचे स्पर्धात्मक सादरीकरण करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. आमदार राहुल कुल ,माजी आमदार रमेश थोरात, महाराष्ट्र राज्य कृषी महामंडळाचे अध्यक्ष वासुदेव काळे, माजी सभापती आप्पासाहेब पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, माजी नगराध्यक्ष इंद्रजीत जगदाळे, माजी नगराध्यक्षा शितल कटारिया, वैशाली नागवडे, दत्तात्रय सावंत, हरिभाऊ ठोंबरे, गुरुमुख नारंग आदी मान्यवर सहभागी होते.