छगन भुजबळ यांना मराठा समाजाने काळे झेंडे दाखवून रस्त्यावर गो मूत्र शिंपडले

येवला : येवला येथे मंत्री छगन भुजबळ यांना मराठा समाजाच्या तरुणांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले असून छगन भुजबळ यांची गाडी ज्या रस्त्याने गेली तो रस्ता गो मूत्र शिंपडून साफ करण्यात आला आहे.

येवला येथे एका गावामध्ये नुकसानीची पाहणी करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ हे आले होते. त्यावेळी काळे झेंडे हातात घेऊन रस्त्यावर उभ्या असलेल्या मराठा समाजातील तरुणांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आणि एक मराठा, लाख मराठा, भुजबळ गो बॅक, गो बॅक अश्या आशयाच्या घोषणा देण्यात आल्या.

यावेळी मराठा समाजातील जमलेल्या लोकांनी भुजबळ यांचा ताफा गेल्यानंतर तेथे छोटेखानी सभा घेऊन भुजबळ यांच्यावर टिका करताना, म्हातारपणी स्वतःचे हाल करून घेऊ नका, मराठा आरक्षणाला पाठिंबा द्या असे म्हणत जरांगे पाटलांच्या आंदोलनात सामिल व्हा, भंगारचाळे थांबवा अशी टिका वक्त्यांनी केली.

सध्या राज्यात मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण असा वाद पेटल्याचे पहायला मिळत आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला आरक्षण जरूर द्यावे मात्र ते ओबीसी कोठ्यातून देऊ नये अशी भूमिका घेतली असून यामुळे संपूर्ण ओबीसी समाजावर अन्याय होईल आणि अगोदरच गरिबी आणि दरिद्रीच्या खाईत भरडत असलेला ओबीसी समाज अजूनही भरडला जाईल अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.