देलवडी च्या ‘लग्नाळू’ तरुणाला ‘लग्नाचा बनाव’ करून 2 लाखांना फसवले, विवाह संस्थेत लग्न केले पण बायकोच नांदण्यास येईना

दौंड : दौंड तालुक्यातील देलवडी या गावातील एका तरुणाची लग्नाचे आमिष दाखवून, लग्नाचा बनाव करून सुमारे दोन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली असल्याची घटना घडली आहे. याबाबत सदर तरुणाने फिर्याद दिल्यानंतर यवत पोलिसांनी 8 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 25/11/2023 ते दिनांक 17/12/2023 या कालावधीमध्ये देलवडी (ता.दौंड) येथील लग्नाळू तरुणाच्या घरी 1) बाबु चव्हाण, 2) सिंधु माळी, 3) सांडु यशवंता जाधव 4) सतिष मधुकर जोषी, 5) चित्रा कैलास अंभोरे, 6) आशा नानासाहेब निकम, 6) ज्योती रविंद्र लोखंडे, 7) मेघा गोपाल सोळंखी, 8) आकाश दिनेश कोटे यांनी संगणमत करून फिर्यादी तरुणाच्या लग्नाचा खोटा बनाव करून, कट रचला. त्यानंतर आरोपिंनी त्यांच्याकडील इर्टीगा गाडीचा वापर करून फिर्यादी याच्यासोबत चित्रा कैलास अंभोरे हीने नाशिक येथील श्री साई वैदिक विवाह संस्था येथे लग्न केले. यावेळी सांडु यशवंता जाधव याने फिर्यादीकडून रोख 2 लाख रूपये घेतले. यानंतर चित्रा अंभोरे ही नांदण्यास फिर्यादीच्या घरी आली आणि परत माघारी जाण्यासाठी निघाली त्यावेळी फिर्यादीने त्यांना हटकले असता त्यास शिवीगाळ, दमदाटी करण्यात आली. या सर्व प्रकारामुळे फिर्यादीला आपले लग्न हा बनाव असून आपली फसवणूक करण्यात आल्याचे लक्षात आले आणि त्यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

तरुणाच्या फिर्यादीवरून यवत पोलिसांनी 1) बाबु चव्हाण (रा.यवत ता.दौंड जि.पुणे) 2) सिंधु माळी (रा.कोरेगांवभिमा ता.शिक्रापुर जि.पुणे) 3) सांडु यशवंता जाधव (रा.मढ ता.जि.बुलढाणा) 4) सतिष मधुकर जोशी (रा.अशोकनगर सातपुते नाशिक, 5) चित्रा कैलास अंभोरे (रा.मनमाड रामलालनगर ता.नांदगांव जि. नाशिक) 6) आशा नानासाहेब निकम (रा.जेलरोड नाशिक) 6) ज्योती रविंद्र लोखंडे (रा.चाचडगांव ता.दिंडोरी जि.नाशिक 7) मेघा गोपाल सोळंखी (रा.पंचवटी नाशिक) 8) आकाश दिनेश कोटे (रा.देवळालीगांव फुलेनगर नाशिक या सर्वांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास यवतचे पोलीस उपनिरीक्षक शेळके हे करीत आहेत.