सहकारनामा – अब्बास शेख
दौंड : वाखारी (चौफुला) ता. दौंड येथील न्यू अंबिका संस्कृतिक कला केंद्राच्या (chaufula new ambika kala kendra) वतीने दर वर्षीप्रमाणे या वर्षीही वारकऱ्यांना जेवण आणि सोबत भक्तिमय लावण्यांची मेजवानी उपलब्ध करून दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे पालखी सोहळा (वारी) बंद ठेवण्यात आली होती. मात्र या वर्षी कोरोना संकट गेल्याने ‘न्यू अंबिका कला केंद्राचे संचालक आणि महाराष्ट्र थिएटर चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष डॉ.अशोक बाबा जाधव आणि सौ. जयश्रीताई अशोक जाधव यांनी पुन्हा एकदा पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी आपली अविरत सेवा सुरु केली आहे.
गेल्या 30 वर्षांपासून न्यू अंबिका कला केंद्राच्यावतीने पालखी सोहळ्यानिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना जेवण देण्यात येते. यावेळी त्यांच्यासाठी भक्तिमय लावण्यांचा कार्यक्रमही आयोजित केला जातो. या सर्वांचा खर्च हा लाखांवर जात असतो मात्र जाधव दांपत्य खर्चाची तमा न बाळगता आपली सेवा सुरूच ठेवत आले आहेत.
दरवर्षी प्रमाणे आज दि. 26 जून 2022 रोजी दुपारी 2:30 वाजता संत तुकाराम महाराजांची पालखी केडगाव-वाखारी सिमेत दाखल झाली. या पालखी सोबत आलेल्या हजारो वारकऱ्यांनी यावेळी न्यू अंबिका कला केंद्राकडून ठेवण्यात आलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला. वारकरी जेवायला बसल्यानंतर त्यांना न्यू अंबिका कला केंद्राचे संचालक डॉ.अशोक बाबा जाधव आणि संचालिका सौ.जयश्रीताई अशोक जाधव यांनी स्वतः जेवण वाढले. यावेळी या कला केंद्रात आपली कला सादर करणाऱ्या महिला लावणी कलाकारांनीही वारकऱ्यांना जेवण वाढून आपले कर्तव्य पार पाडले.
यावेळी डॉ.अशोक बाबा जाधव यांनी बोलताना, राज्यात चांगला पाऊस पडू दे, ईडा पीडा टळू दे आणि कोरोना सारख्या महामारीपासून सर्वांचे रक्षण होऊ दे अशी प्रार्थना केली तर जयश्रीताई जाधव यांनी बळी राजावर आणि राज्यावर आलेले संकट टळू दे, प्रत्येकाला सुख,समृद्धी लाभू दे आणि सर्वांच्या इच्छा आकांक्षा पुऱ्या होऊ दे अशी प्रार्थना केली.