इंदापूर : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात मंत्री छगन भुजबळ यांची एल्गार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत छगन भुजबळ यांनी बोलताना आमचा मराठा समाजाला विरोध नाही मात्र झुंडशाहीला विरोध आहे आणि वेळ पडली तर झुंड शाहिला झुंड शाहिनेच उत्तर दिले जाईल. सौ सोनार की तो एक लोहार की असे म्हणतछगन भुजबळ यांनी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण नसावे ही आपली भूमिका स्पष्ट केली.
छगन भुजबळ यांनी अत्याचारांचा पाढा वाचला, यांना थांबवावं लागेल असही सांगितलं.. छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणामध्ये झुंडशाहीचा दाखला देताना राहाता येथील एक उदाहरण दिले. राहाता येथील पिंपरी निर्मळ येथे दोन दलित कुटुंब आहेत. या कुटुंबानी कोणत्यातरी घोरपडे यांच्या विरोधात मतदान केले म्हणून तेथील चारशे ते पाचशे लोकांनी लोकांनी त्यांच्या घरावर हल्ला केला, घर उध्वस्त केले. त्या घरातील लोकांना मारहाण केली, लहान मुलांना दगडावर फेकले अशी माहिती दिली. मागे नाभिक समाजावर हल्ला करण्यात आला, फलटण येथील डॉक्टरांच्या हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे की नाही, आणि कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी कुणाची आहे असा सवाल करत त्यांनी अंतरवाली सराटी येथील दाखला दिला.
अंतरवाली सराटी येथे त्या दिवशी नेमकं काय घडलं हे भुजबळांनी सांगितलं अंतरवाली सराटी येथे जरांगे यांना पोलीस हॉस्पिटल मध्ये घेऊन जायला आले तर ते म्हणाले सकाळी येतो. सकाळी पोलीस गेले तर तेथे अगोदरच जमवून ठेवलेल्या दगडांनी पोलिसांवर हल्ला करण्यात आला, महिला पोलिसांच्या अंगावर हात टाकण्यात आला आणि मग पोलिसांनी बचवासाठी लाठीहल्ला केला असे छगन भुजबळ यांनी सांगितले. याबाबत उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल लेखी माहिती दिली असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 79 पोलीस जमावाच्या हल्ल्यात जखमी झाले आणि पोलिसांनी वाजवी बळाचा वापर केला त्यावेळी 50 आंदोलक जखमी झाले असे भुजबळ यांनी सांगितले. ही बाजू त्यावेळी पुढे आली असती तर त्याला (जरांगे) यांना सहानुभूती मिळाली नसती. मी दोन महिने हेच सांगतोय असे त्यांनी सांगत राज्यात अशांतता कोण माजवत आहे आपण पाहत आहोत. त्यामुळे अश्या झुंडशाही, दादागिरीला आमचा विरोध राहिल आणि दादागिरीला मग दादागिरीनेच उत्तर दिले जाईल असे आव्हान त्यांनी दिले.
तुम्ही जाळपोळ केली आणि तेथे मुसलमानांनी त्यांना वाचवले, हेच का तुमचे संस्कार छगन भुजबळ यांनी हल्ल्यांची माहिती देताना, बीड मध्ये आमदारांची घरे, हॉटेल्स पेटवली. घरांवर पेट्रोल बॉम्ब फेकले, गाड्या पेटवल्या, त्यांची बायका, मुले कशीतरी वाचली. क्षीरसागर यांच्या घरातील बायकानी तर घराच्या मागच्या बाजूला जाऊन मुलांना खुर्चीवरून भिंतींवर चढवले त्यावेळी त्यांच्या मदतीला तेथे मुस्लिम समाज धावून आला आणि समाजातील लोकांनी या बायका, मुलांना वर ओढून घेतलं आणि आपल्या घरी घेऊन जाऊन त्यांची सुरक्षा केली. महाराजांची ही तर शिकवण कधीच नव्हती की तुम्ही एखाद्याच्या घरावर, बायका पोरांवर हल्ला करा, स्वकियांवर हल्ला करा म्हणून… अश्या प्रकारे त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
भुजबळांच्या डोक्याचा एक केस ही कुणी वाकडा करू शकत नाही – आमदार गोपीचंद पडळकर इंदापूर येथील सभेत बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी तुफान फटकेबाजी केली. छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहेत त्यांना कुणी आव्हान देण्याचा प्रयत्न करू नये. त्यांच्या डोक्याचा एक केसही कुणी वाकडा करू शकत नाही असे पडळकर यांनी म्हणत या लोकांना आता बहुजन समाज संपवायचा आहे. त्यामुळे यांना आपल्यातून आरक्षण घेऊन आपल्या जागेंवर हक्क सांगायचा आहे. यांना आपल्या धनगर, माळी, कोळी, रामोशी, कुंभार, मुसलमान, दलित बांधवांचा हक्क हिरावून घ्यायचा आहे आणि त्यामुळेच यांचा हा खटाटोप सुरु आहे. यांना ओबीसी कोट्यातून निवडणुका लढवायच्या आहेत आणि आपले प्रस्थ सगळीकडे वाढवायचे आहे त्यामुळे आता आपल्याला राजकारण, गट-तट, जात-पात बाजूला ठेवून एक व्हायचे आहे आणि छगन भुजबळ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहायचे आहे पडळकर यांनी सांगितले. तसेच राज्यात संपूर्ण धनगर बांधव हा ओबीसी नेत्यांच्या, भुजबळांच्या पाठीशी उभा आहे असे विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आज झालेल्या सभेला ओबीसी समाजातील लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. आजच्या या सभेत अनेक वक्त्यांनी आपली मते मांडली आणि आपला छगन भुजबळ यांना पाठिंबा दर्शवीला.