राहू मध्ये महावीर जयंती उत्साहात साजरी

दौंड : रविवार दि.21 एप्रिल 2024 रोजी भगवान महावीर जयंती (कल्याणक) निमित्त राहू येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये भगवान महावीर जन्मदिन साजरा करण्यात आला.

https://youtube.com/@Sahkarnama?si=vyfam4hrlfv4rsp8
नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी आमचे सहकारनामा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा

यावेळी सरपंच दिलीप देशमुख सर आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भगवान महावीर स्वामी प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सरपंच  देशमुख यांनी बोलताना, भगवान महावीर हे  वयाच्या 30 व्या वर्षी सर्व राजपाट सोडून संसारिक संपत्तीचा त्याग करून अध्यात्मिक प्रबोधनाच्या शोधात घर सोडून बाहेर पडले आणि त्यानंतर ते तपस्वी बनले. साडेबारा वर्ष कठोर तपश्चर्याकरून त्यांनी अनमोल असे ज्ञान प्राप्त केल्याचे सांगितले.

त्यांच्यानंतर डॉ.भंडारी यांनी बोलताना, भगवान महावीर हे वर्धमान म्हणून संबोधले जात होते. त्यांच्या जन्मानंतर कुंडलपूर येथे भरभराट झाली. वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी राज घराण्याच्या सर्व सुख सोयी सोडून त्याग केला व जैन धर्माची दीक्षा घेतली. त्यानंतर त्यांनी अखंड 30 वर्ष जैन धर्माचा प्रचार, प्रसार केला. जैन धर्माची सत्य, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, अहिंसा या तत्वांचा त्यांनी प्रचार केला. जगा आणि जगू द्या हे त्यांचे मूळ तत्व होते. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांना मोक्ष प्राप्त झाला असे त्यांनी शेवटी सांगितले.

भारतीय जैन संघटनेचे हर्षल भटेवरा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, भगवान महावीर यांनी सर्व जगाला अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, शाकाहार याची शिकवण दिली. या शिकवणीची व अहिंसा परमोधर्म या तत्त्वाचे पालन करणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे सांगितले. तसेच दरवर्षी राहू गावामध्ये जैन समाजा बरोबर राहू ग्रामस्थ हे जैन समाजाचा सण म्हणून जन्म कल्याणक एकत्रितपणे साजरा करतात त्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानून सर्वांना महावीर जन्म कल्याणकच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी राहु गावचे सरपंच दिलीप देशमुख, उपसरपंच गणेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, राहू येथील प्रसिद्ध डॉ. विलास भंडारी, शशिकांत भंडारी, धरमचंद भटेवरा, भारतीय जैन संघटना पुणे विभागाचे उपाध्यक्ष हर्षल भटेवरा, विजय भटेवरा, सुनील भटेवरा व इतर ग्रामस्थ उपस्थित होते