दौंड : देलवडी (तालुका दौंड) येथील आईच्या बनामध्ये गलांडवाडी येथील महिलांनी ११ झाडांचे वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने महिला दिन साजरा केला. यावेळी गलांडवाडी ग्रामपंचायतीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी देलवडी येथील आईच्या बनाला भेट देत गलांडवाडी ग्रामस्थांच्या वतीने १,१११ रुपयांची आईच्या बनाच्या संगोपनासाठी देणगी दिली.
देलवडी येथे वृक्षारोपण केल्यानंतर माजी सरपंच ज्योती शितोळे म्हणाल्या की, एक मित्र एक वृक्ष संघटना व देलवडी ग्रामस्थांच्या वतीने ६०० झाडांचे आईचे बन २ वर्षापुर्वी साकारले आहे. बनामध्ये गावातील प्रत्येक युवकांनी स्वतःच्या आईच्या नावाने झाड लावले आहे व जगवले आहे. या उपक्रमाची दखल संपूर्ण महाराष्ट्रभर घेतली गेली. युवकांच्या योगदानातून सर्व झाडे सुस्थितीत आहेत.
आज महिला दिनानिमित्त या बनामध्ये आम्हा महिलांच्यावतीने वड, आंबा ,पिंपळ,पेरु आदी ११ देशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी गलांडवाडीच्या उपसरपंच वर्षा देवकर, माजी सरपंच पल्लवी कदम, ज्योती शितोळे, खरेदी विक्री संघाच्या माजी उपसभापती अनामिका भापकर, सविता देवकर, सारिका कदम, वैशाली शितोळे, सुनीता कदम, स्वाती नाहटा, निर्मला पाडळे आदी महिला उपस्थित होत्या. ग्रामस्थांच्या वतीने दत्तात्रय शेलार व सागर निगडे यांनी स्वागत केले.