केडगावचे दत्तपार्क चोरट्यांच्या हिटलिस्टवर! चारचाकी वाहनातून चोरटे सोसायटीमध्ये दाखल, घटना CCTV मध्ये कैद… (पहा व्हिडीओ)



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड तालुक्यातील केडगाव स्टेशनमध्ये असणाऱ्या दत्तपार्क सोसायटीला चोरट्यांनी टार्गेट केले असून दर दोन-तीन महिन्यांनी चोरटे या ठिकाणी येऊन येथील वाहने, पैसे, दागदागिने अश्या काहीना ना काही वस्तू चोरी करून जात असल्याने येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत.

याबाबत येथील रहिवासी वैभव वैद्य यांनी ‛सहकारनामा’शी संपर्क साधून या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे.

पहा व्हिडीओ – केडगावच्या दत्तपार्कमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

दि. 19 डिसेंबर रोजी सकाळी येथील रहिवासी वैभव वैद्य यांना त्यांच्या सोसायटीमध्ये बसविलेले सीसीटीव्ही कमेऱ्यापैकी एक कॅमेरा कुणीतरी फिरवून तो तोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसले. त्यांनतर रात्री काहीतरी अजब घडल्याची शंका त्यांना आल्याने त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले आणि त्यांना धक्काच बसला कारण…

सालाबादप्रमाणे दि.19 डिसेंबर रोजीही चार ते पाच चोरटे मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास दत्तपार्क सोसायटीमध्ये आलिशान चारचाकी वाहनातून आले असल्याचे त्यामध्ये दिसले. या चोरट्यांचा हातामध्ये कटावणी व चोरी करण्याचे विविध हत्यारे दिसली त्यावेळी मात्र हे चोरटेच असल्याचे येथील रहिवाश्यांची खात्री झाली आणि यानंतर त्यांनी सीसीटीव्ही मध्ये कैद असणारे व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये घेऊन ते ‛सहकारनामा’ला पाठवले आहेत.

या घटनेमध्ये चार ते पाच चोरटे दिसत असून ते बिनधास्तपणे या परिसरात आपले चारचाकी वाहन घेऊन दाखल होत परिसराची पाहणी करताना दिसत आहेत.

पाहणी झाल्यानंतर हे चोरटे एका इमारतीमध्ये घुसून अगोदर सीसीटीव्ही कॅमेरा हातातील कोयत्याच्या साहाय्याने फिरवताना दिसत असून त्यांनतर फ्लॅट फोडण्याच्या उद्देशाने पाहणी करताना दिसत आहेत.

या गंभीर प्रकारामुळे येथील रहिवाश्यांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. या ठिकाणी दर 2-3 महिन्यामध्ये असे प्रकार घडत असून अनेकांच्या घरातील मौल्यवान वस्तू, दागदागिने, पैसे आणि वाहने चोरीला गेलेली आहेत. 

त्यामुळे आता पोलिसांनी या ठिकाणी दिसणाऱ्या चोरट्यांना जेरबंद करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा पुढे या ठिकाणी मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.