देऊळगाव गाडा (दौंड) : दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा येथील कला केंद्राचा वाद चिघळला असतानाच आता सरपंचांच्या पतीने ग्रामपंचायतच्या सिसिटीव्ही रूममध्ये जाऊन तेथील सिसिटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत दि.२०/०२/२०२५ रोजी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १३/०९/२०२४ रोजी ०१:२७ ते ०२:०७ या दरम्यान यातील आरोपी १) सोमनाथ शिवाजी बारवकर (रा. देऊळगाव गाडा ता. दौंड जि. पुणे) व एक अज्ञात इसम यांनी देऊळगाव गाडा ग्रामपंचायत मधील ग्रामपंचायतीचे मालकीची सीसीटीव्ही फुटेज रूममध्ये जाउन कोणतीही कायदेशीर परवानगी नसताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केली त्यामुळे त्यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत देऊळगाव गाडाचे ग्रामसेवक राजेंद्र श्रीरंग कदम (वय ५३ वर्षे व्यवसाय नोकरी (ग्रामसेवक ‘देऊळगाव गाडा) यांनी फिर्याद दिली.
कला केंद्रावरून मोठा वाद – देऊळगाव येथील कला केंद्रास ग्रामपंचायतीने दिलेल्या ना हरकत दाखल्यावरून अगोदरच मोठा वाद सुरु आहे. याच कारणावरून २६ जानेवारीच्या झालेल्या ग्रामसभेत मोठा गदारोळ झाला होता. त्यातच त्यावेळच्या सरपंच ज्योती जामकर यांनी ग्रामपंचायतीला दिलेल्या पत्रामध्ये मी कलाकेंद्र सुरु करण्यासाठी कोणताही दाखला दिलेला नाही असे लेखी पत्र दिल्याने या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. त्यांच्या नावे कुणीतरी बनावट दाखला दाखला दिला आहे, दाखल्यावर केलेल्या सह्या त्यांच्या नाहीत असा दावा त्यांनी केला असल्याने मग हा दाखला कुणी दिला याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
ती माझी सही नाही, मी ठराव केला नाही.. तत्कालीन सरपंच ज्योती जामकर यांनी आपल्या पत्रामध्ये असे नमूद केले आहे की, १५ ऑगस्ट २०१६ रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेला आपण आजारी असल्याने उपस्थित राहिलो नव्हतो. त्यामुळे कला केंद्राच्या ना हरकत दाखल्यावर कुणीतरी इसमाने आपली बनावट सही केली. या बनावट सहीच्या आधारे आमच्या नावाने खोटे ठराव करण्यात आले. यावेळी या सभेचे अध्यक्ष कोण होते, हे ठराव कुणी केले? आमची खोटी सही कुणी केली याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी दिलेल्या पत्रामध्ये केली आहे.
येथील देऊळगाव गाडा येथील कला केंद्र हे दिवसेंदिवस वादाचे कारण बनू लागले आहे त्यामुळे हे कला केंद्र बंद करावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. जर हे कला केंद्र बंद झाले नाही तर आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.