ग्रामपंचायतला निवडून येण्याची शास्वती नाही प्रचार मात्र आमदारकीचा |  सोशल मिडियावर जोरदार प्रचार, तो तिसरा कोण..?

अब्बास शेख

दौंड : दौंड तालुक्याची सध्याची राजकीय परिस्थिती खूपच बिकट झाल्याचे पहायला मिळत आहे. एक-दुसऱ्याचे कट्टर विरोधक असणारे कुल – थोरात खासदारकीला एकत्र फिरताना पहायला मिळाले. यानंतर आमदारकीची स्वप्ने पाहणाऱ्या अनेकांनी त्यांचे फोटो सोशल मिडियावर टाकून हे आतून एक होते आणि बाहेरून वेगळे दाखवत होते अशी टिका केली.

आ.राहुल कुल आणि मा.आ.रमेश थोरात या दोघांनी एकत्र काम करूनही बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना दौंड तालुक्यात मोठा फटका बसला. या सर्व घडामोडीनंतर कुल,थोरात गटाच्या कार्यकर्त्यांनी एक दुसऱ्यावर खापर फोडायला सुरुवात केली. याचा फायदा काहींनी उचलून यावेळी हे दोघे नको तर तिसरा पर्याय दिला गेला पाहिजे असा आवाज टाकण्यास सुरुवात केली. मात्र हा आवाज इतका दुमदूमला की तिसऱ्या पर्यायासाठी नको नको ती नावे पुढे येऊ लागली आहेत.

ज्यांनी कधी ग्रामपंचायत सुद्धा लढवली नाही ते भावी आमदार म्हणून सोशल मिडियावर आपला प्रचार करू लागले आहेत. ज्यांनी गाड्यांच्या काचा कधी खाली घेतल्या नाही, प्रत्येकवेळी कोणत्या न कोणत्या पक्षाची, संस्थेची फक्त पदे पदरात पाडून लोकांमध्ये वावरत राहिले असे अनेकजण आता आमदार होण्याचे स्वप्न पाहू लागले आहेत. आपल्याला घटनेने समान न्याय दिला आहे. कोणी कोठूनही निवडणुकीला उभा राहू शकतो त्याबाबत दुमत नाही. मात्र ज्यांना गावात विचारेना कुत्र त्यांचे सोशल मिडियावर हजारो मित्र आणि या सोशल मीडियावरील मित्रांच्या सहाय्याने जर निवडणुकीला उभे रहायचे म्हटले तर पुढे काय दिवे लागणार हे सर्वांनाच माहित आहे.

फडणवीस, शिंदेना अटक..

दौंड तालुक्यात तिसरा पर्याय यायला हवा आणि तो काळानुरूप गरजेचाही आहे, मात्र त्यासाठी पुढील व्यक्ती तितकी सक्षम असणे गरजेची आहे. त्या व्यक्तीला माणणाऱ्या मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणावर असणे गरजेचे आहे. त्यांचे स्वतःचे पॉकेट मतदान गरजेचे आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात मदत करणारा आणि कायम प्रत्येकाच्या अडचणींना धावून येणारा नेता जनतेच्या मनात घर करून बसलेला असतो. त्यामुळे जो जनतेच्या पसंतीस उतरेल तो पुढे चमकेल अशी परिस्थिती आहे. मात्र पावसाळ्यात जश्या छत्र्या उगवतात तसे निवडणुका तोंडावर आल्या की अनेकजण उगवताना दिसतात. वेगवेगळे प्रयोग करायला लागतात मात्र अचानक आलेल्यांना जनता किती स्वीकारते हे राज्यात झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये आपण पाहिले आहे.

त्यामुळे कुल आणि थोरात यांना टक्कर देण्यासाठी आणि त्यांना हरवून विजयी होण्यासाठी तिसरा पर्याय म्हणून सामोरं जाणारं नेतृत्वही तितकं खमकं असलं पाहिजे. आज दोन्ही नेत्यांना मानणाऱ्या मतदारांची संख्या मोठी आहे. दौंड तालुक्यात कुल आणि थोरात यांच्या व्यतिरिक्त तिसरा पर्याय निवडून देण्यासाठी तिसऱ्या पर्यायाने मोठ्या ताकदीनीशी निवडणुकीत उतरणे गरजेचे आहे. जनता निवडून देऊ शकेल असा खमका पर्याय हा सर्वानुमते उभा राहिलेला हवा अन्यथा जनतेकडून पुन्हा या दोघांमधीलच कोणीतरी एक निवडून दिला जाईल यात शंका नाही.