दौंड मध्ये व्यापाऱ्याला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा दाखल

अख्तर काझी

दौंड : दुकानासमोरील मोकळ्या जागेत माल का ठेवला आहे, या कारणावरून झालेल्या वादातून व्यापाऱ्याला चौघांनी मारहाण केल्याची घटना शहरातील शिवाजी चौक परिसरातील व्यापारी संकुलामध्ये घडली. या मारहाणीमध्ये व्यापाऱ्याच्या हातावर कटरने वार करण्यात आला असून, हाताचे बोट फॅक्चर झाले आहे.

याप्रकरणी अब्दुल माजिद दस्तगीर शेख(वय 40,रा. पाटील चौक, दौंड) यांनी फिर्याद दिली. दौंड पोलिसांनी दिवेश रमेश राठोड, प्रमोद बाबूलाल राठोड, महेंद्र बाबूलाल राठोड,  पवन बाळू निकम (सर्व रा. दौंड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दिनांक 24 जून रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कोहिनूर कॉम्प्लेक्स इमारतीमध्ये घडली.

फिर्यादी यांचे या व्यापारी संकुलामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीचे दुकान आहे. आणि त्यांच्या शेजारीच राठोड यांचे सुद्धा मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीचे दुकान आहे. फिर्यादी दिनांक 24 जून रोजी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता, राठोड यांच्या दुकानाच्या समोरील मोकळ्या जागेत त्यांनी वॉशिंग मशीन चे बॉक्स ठेवलेले होते. त्यामुळे फिर्यादी यांना त्यांच्या दुकानात जाण्यासाठी अडथळ्याचे होत होते. त्यामुळे फिर्यादी यांनी राठोड यांना सांगितले की, बॉक्स बाजूला काढून ठेवा. मोकळी जागा ही जाण्या येण्यासाठी आहे, सामान ठेवण्यासाठी नाही. ग्राहकाने माझ्या दुकानात यायचे कसे.

तसेच फिर्यादी यांनी याबाबत राठोड यांची तक्रार नगरपालिकेकडे सुद्धा केलेली असल्याने याचा राग मनात धरून चौघा आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करीत लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली. दिवेश राठोड याने लाकडी दांडक्याने फिर्यादी यांच्या हाताच्या पंजावर मारहाण करून जखमी केले, प्रमोद राठोड याने दुकानातील कटरने हातावर वार केला. फिर्यादी यांना जीवे मारून टाकण्याची धमकी दिली असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार राहुल घाडगे करीत आहेत.