पुणे : राज्यातील बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठवण्याचा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी हा निर्णय स्वागतार्ह आहे. हा निर्णय राज्यातल्या शेतकऱ्यांच्या हिताचा, पशुधनाचं संरक्षण, संवर्धन करणारा ठरेल. या निर्णयानं बैलधारक शेतकऱ्यांनी प्रदीर्घ लढाई जिंकली आहे. हा राज्यातल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याचे म्हटले आहे.
तसेच बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्यानंतर या लढाईत आदरणीय शरद पवार (Sharad Pawar) साहेबांनी लक्ष घातलं. मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), जयंत पाटील (Jayant Patil), खासदार अमोल कोल्हे (Dr.Amol Kolhe) यांच्यासारख्या नेत्यांनी, अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ही लढाई ध्येयनिष्ठेनं, संपूर्ण ताकदीनं लढली त्यामुळे ही लढाई जिंकता आल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या लढाईत सहभागी सर्व नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो व आभार मानतो असे म्हटले आहे.
महाविकास आघाडी सरकारनं सर्वशक्तिनिशी या न्यायालयीन लढाईला बळ दिलं. त्यातून मिळालेलं हे यश राज्यातल्या शेतकऱ्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण करेल. बैलगाडा शर्यती आता राज्यात पुन्हा सुरु होतील. मात्र शेतकऱ्यांनी सर्व अटी, नियमांचं पालन करा, असं आवाहन अजित पवार यांनी करताना सर्वोच्च न्यायालयानं बंदी उठवण्यासंदर्भात आज दिलेल्या निर्णयावर पुन्हा घटनापीठ विचार करणार असलं तरी, तिथंही शेतकऱ्यांचाच विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.