दौंड : बिहार मधील बुद्धगया येथील तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विहार व्यवस्थापनाचा ताबा ब्राह्मण धर्म पंडितां ऐवजी बौद्ध अनुयायांना द्यावा या मागणीसाठी संपूर्ण देशामध्ये आंदोलने चालू आहेत. त्याच अनुषंगाने दौंड मध्येही बौद्ध अनुयायांनी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शहरातून मोर्चा काढला.
आंदोलनामध्ये बहुसंख्येने बौद्ध अनुयायी सहभागी होते. येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातील बाबासाहेबांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरुवात करण्यात आली. तहसील कार्यालय परिसरात आंदोलनाची सांगता करण्यात आली. यावेळी बौद्ध अनुयायांच्या वतीने राष्ट्रपती आणि बिहारचे मुख्यमंत्री यांच्या करिता तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले.
निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, मागील 23 दिवसांपासून बौद्ध भिक्खू व बौद्ध समाजाच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्तीसाठी देशभर आंदोलने सुरू आहेत. हिंदू, मुस्लिम तसेच जैन मंदिरांच्या देखभालीसाठी त्या त्या समाजाच्या लोकांनाच नियुक्त करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने तथागत गौतम बुद्ध यांची ज्ञानप्राप्ती झालेल्या बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध धम्मय भिक्खू व बौद्ध अनुयायी यांचे व्यवस्थापनाखाली असणे ही बाब न्यायिक असल्याने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी बौद्ध धम्मियांच्या वतीने बुद्धगया येथे आंदोलन चालू असून त्यास देश तसेच जगभरातील बौद्ध धम्मियांनी पाठिंबा दिला आहे.
महाबोधी महाविहाराचे ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात येत असल्याने बुद्धगया मंदिर कायदा 1949 मध्ये दुरुस्ती करून महाबोधी महाविहार बौद्धांचे देखरेखी खाली व्यवस्थापनासाठी देण्यात यावे, वास्तविक भारतीय संविधानाचे अनु. नुसार दिनांक 26 जानेवारी 1950 पूर्वीचे कायदे निष्कासीत करण्यात आले असल्याने अनु.13 ची अंमलबजावणी करून महाबोधी महाविहार ब्राह्मणी करण्यापासून मुक्त करणेबाबत सत्वर कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. नागसेन धेंडे, सागर उबाळे, बी. वाय. जगताप, श्रीकांत शिंदे, सचिन खरात, प्रमोद राणेरजपूत, अमित सोनवणे, राजेश मंथने, भारत सरोदे, यादव जाधव आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.