अख्तर काझी
दौंड : शहरातील नियोजित बुद्ध विहाराचे (सि. सर्वे नं. 21 अ, व 21 ब) उर्वरित काम तत्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी, ऑल इंडिया पॅंथरसेना व भीम वॉरियर्स संघटनेच्या वतीने दौंड नगरपालिकेला करण्यात आली आहे.
नगरपालिकेला दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, दौंड नगरपालिकेमार्फत सदरच्या बुद्धविहाराचे बांधकाम सन 2016 पासून सुरू करण्यात आले आहे, मात्र मागील आठ वर्षापासून फक्त पायाभरणीचे काम झाले असून तेही अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसत आहे.
सदरचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. दि.24 ऑगस्ट 2016 रोजीच्या शासनाच्या प्रपत्राद्वारे वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत तब्बल तीन कोटींचा निधी तसेच वेगवेगळ्या स्वरूपात आर्थिक निधी नगरपालिकेकडे वर्ग झाला असताना सुद्धा बुद्ध विहाराचे बांधकाम मात्र पायाभरणीच्या पुढे येताना दिसत नाही. मागील काही महिन्यात त्या ठिकाणाहून बांधकामासाठी लागणारे लोखंडी गज चोरट्यांनी चोरून नेल्याचे समजते आहे.
यावरून नगरपालिका या घटनेकडे जाणीवपूर्वक व द्वेष भावनेतून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे. याचा सर्व संघटनांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून सदर रखडलेले बुद्ध विहाराचे बांधकाम त्वरित करण्यात यावे व काम सुरू असताना काही गैरप्रकार घडू नये, बुद्धविहाराचे धार्मिक पावित्र्य कायम राहण्यासाठी शहरातील काही प्रमुख लोकांची समिती यासाठी गठित करण्यात यावी व त्या समितीच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध विहाराची वास्तू उभी करावी अशी विनंती ही निवेदनातून करण्यात आली आहे.
दि.22 जुलै 2024 च्या आधी जर बुद्ध विहाराचे बांधकाम सुरू करण्यात आले नाही तर दौंड नगरपालिकेसमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही दलित संघटनांनी नगरपालिकेला दिला आहे. निवेदन देतेवेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पुणे जिल्हा युवक आघाडीचे अध्यक्ष अमित सोनवणे, भीम वॉरियर्स संघटनेचे अध्यक्ष प्रमोद राणे रजपूत तसेच ऑल इंडिया पॅंथर सेनेचे दौंड तालुका अध्यक्ष सागर उबाळे तसेच भिम अनुयायी उपस्थित होते.
आ. कुल यांची माहिती – दौंड शहरात बुद्ध विहाराची एक चांगली वास्तू उभी राहावी म्हणून प्रयत्नशील असणारे आमदार राहुल कुल यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, बुद्ध विहाराचे काम पुन्हा पूर्ववत सुरू व्हावे म्हणून संबंधित ठेकेदाराच्या ज्या अडचणी होत्या त्यावर योग्य प्रकारे मार्ग काढलेला आहे व बुद्धविहाराचे काम लवकरच पुन्हा सुरू होणार आहे.
सदरच्या बुद्धविहाराचे काम पुन्हा सुरळीत सुरू व्हावे यासाठी प्रयत्नशील असणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सतीश थोरात यांना याविषयी विचारले असता ते म्हणाले की, दि.13 जुलै रोजी संबंधित ठेकेदाराशी या कामाबाबत पूर्णपणे चर्चा झालेली आहे. संबंधित ठेकेदाराला होत असलेल्या अडी अडचणींवर मार्ग काढून ठेकेदाराशी समाधानकारक चर्चा झालेली आहे. बुद्ध विहाराचे उर्वरित काम त्वरित सुरू करण्याबाबत आमदार राहुल कुल यांनी ठेकेदारास तशा सूचनाही केलेल्या आहेत. त्यामुळे लवकरच प्रलंबित बुद्ध विहाराचे काम सुरू होणार असल्याचे सतीश थोरात यांनी सांगितले.