काल ‘खून’ आज भावांनी भावाचे ‘हातपाय’ तोडले | सलग दोन घटनांनी दौंड हादरले

दौंड | (अब्बास शेख) दौंड तालुक्यात घडलेल्या दोन घटनांमुळे संपूर्ण तालुका हादरून गेला आहे. काल दौंड पोलिस स्टेशन हद्दीत असणाऱ्या गिरीम येथे खून झाला होता. ही घटना ताजी असतानाच आज यवत पोलिस स्टेशन हद्दीत असणाऱ्या बिरोबावाडी येथे शेतीच्या वादातून भावांनीच भावाचे हात पाय तोडल्याने एकच खळबळ माजली आहे. सख्खा चुलत भावांनीच आपल्या भावाचा गुडघ्यातून पाय आणि मनगटातून हात तोडल्याने किरकोळ वादात आता नात्यांनासुद्धा काहीच किंमत राहिली नाही हे स्पष्ट होत आहे.

ही घटना दौंड तालुक्यातील बिरोबावाडी येथे घडली आहे. तिघा चुलत भावांनी एकावर जीवघेणा हल्ला करत त्याचे हात पाय तोडले आहेत. या हल्ल्यात या तरुणाचे दोन्ही अवयव हे धडावेगळे झाले आहेत. याबाबत यवत पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आल्यानंतर यवत पोलिसांनी सोमनाथ हगारे, प्रवीण हगारे, गणेश हगारे आणि इतर तीन जणांच्या विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार, बिरोबावाडी (ता.दौंड) येथे शेतीच्या बांधावरून चुलत भावांमध्ये वाद सुरु होता. हा वाद इतका विकोपाला गेला की या वादातून चुलत भावांनी आपल्या एका चुलत भावाचे अतिशय क्रूरपणे हात पाय तोडून ते शरीरापासून वेगळे केले. कैलास हगारे असं गंभीर जखमी झालेल्या शेतकरी तरुणाचं नाव आहे. त्याच्यावर हल्ला झाल्यानंतर तो यात गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल केलं आहे.

घटनेची माहिती यवत पोलिसांना मिळताच यवत पोलीस घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा करून सोमनाथ हगारे, प्रवीण हगारे, गणेश हगारे आणि इतर तीन जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात यवत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सपांगे हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.