पंढरपूर : करकंब (ता.पंढरपूर) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीला भावजईनेच फूस लावून कलाकेंद्रावर नाचण्यासाठी पाठविले असा गैरसमज करून सावत्र दीर, सावत्र सासू आणि सासरा यांनी कुऱ्हाडीने वार करून सावत्र भावजयीचा खून केला आहे. करकंब पोलिसांनी त्वरित कारवाई करत यातील आरोपी सावत्र दिराला जेरबंद केले आहे.
खून झालेल्या महिलेचे नाव हेमा आकाश काळे (वय 35) असे असून करकंब येथे टेंभी रोडजवळ ही भयानक घटना घडली आहे. खूनाच्या आरोपखाली पोलिसांनी सावत्र दीर मुकुंदराजा काळे यास ताब्यात घेतले आहे. मुकुंदराजा याची पत्नी मागील एक महिन्यापासून जामखेड येथे कलाकेंद्रावर नाचकाम करण्याकरिता जात होती. तिला मयत हेमा हिनेच शिकवून पाठविले आहे असा संशय मुकुंदराजा याला होता. त्यामुळे मुकुंदराजा आणि त्याचे आई, वडील हे सर्वजण आकाश आणि त्याची पत्नी हेमा यांच्यावर चिडून होते.
हेमा काळेचा पती आकाश बिंदल काळे हा पुणे जिल्ह्यातील भिगवण येथे त्याच्या साडूकडे कामाला होता. आकाशची पत्नी हेमा ही करकंब येथे आपल्या मुलांसोबत राहत होती. आकाश हा साड्डू सुमित काळे (रा. भिगवण) यांच्याकडे मासे पकडण्याचे काम करतो.
आपला जीव धोक्यात असल्याचे हेमाला जाणवत होते –
आपल्यावर सावत्र दीर, सावत्र सासू, सासरे हे चिडून आहेत त्यामुळे आपला जीव धोक्यात आहे हे हेमाला जाणवत होते त्यामुळे तिने ही बाब तिचा पती आकाश हा घरी असताना त्याला सांगितली. त्यावेळी आकाशने तिला तू लक्ष देऊ नको, मी पाणी घेऊन येतो असे म्हणत घराबाहेर गेला आणि पाणी घेऊन येत असताना बिंदूल, शालिका आणि मुकुंदराजा हे मारायला येत असल्याचे त्याला दिसले. यावेळी त्याचा सावत्र भाऊ मुकुंदराजा हातात कुन्हाड घेऊन हेमावर धावला. तुझ्यामुळेच माझी बायको कलाकेंद्रावर जायला लागली, तुला मारून टाकतो म्हणत तिच्या मानेवर कुन्हाडीने वार केले, तर बिंदूल व शालिका काळे यांनी हेमाला धरले.
या हल्ल्यात हेमा जागीच ठार झाली. ही घटना आकाशने डोळ्याने पाहताच त्याने करकंब पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मुख्य आरोपी मुकुंदराजा काळे याला अटक केली. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कुंजीर हे करीत आहेत.