दौंड : दौंड तालुक्यातील वरवंड जवळ पुणे सोलापूर महामार्गावर असणारे रस्ते दुभाजक (डिव्हायडर) तोडण्यात आल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. सुमारे 50 ते 60 फूट लांबीचे रस्ते दुभाजक दोन ठिकाणी तोडण्यात आल्याने येथून दुचाकी, चारचाकीसह अन्य वाहने अनधिकृतपणे रस्ता ओलांडू लागली आहेत. त्यामुळे येथे एखादा भिषण अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
हे रस्ते दुभाजक कोणी आणि का तोडले आहेत आणि येथे कशाचे प्रयोजन आहे याबाबत पुणे-सोलापूर वे प्रा.ली. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयसिह यांच्याशी संपर्क साधला असता, काही कामासाठी त्या ठिकाणी ट्रॅफिक डायव्हर्ट करायचे आहे त्यामुळे तेथे दोन ठिकाणी रस्ता दुभाजक तोडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसेच हे डिव्हायडर तोडण्याची सर्व अधिकृत परवानगी घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी NHAI चे PD यांना संपर्क साधला असता तेथील डिव्हायडर बंद करण्यास सांगितला असून याबाबत करवाई करण्यास सांगितले असल्याची माहिती त्यांनी दिली असल्याने येथील कामाबाबत संशय निर्माण झाला आहे आणि हे डिव्हायडर तोडताना NHAI ची परवानगी घेतली गेली होती का याबाबतही त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
वरवंड गावाजवळ एक जुने रस्ता दुभाजक होते. या रस्ता दुभाजकावर ट्रक आणि चारचाकी वाहनाचा भिषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये वरवंड येथील एक प्रतिष्ठित नेते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर काही काळाने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर येथील रस्ता दुभाजक कायमचा बंद करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा त्या दुभाजकाच्या पुढे काही अंतरावरच रस्ते दुभाजक तोडण्यात आल्याने तेथेही रस्ता ओलांडण्याचे गंभीर प्रकार वाढले असून त्यामुळे येथे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
संबंधित कंपनीने काम करताना सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असेल तर मग रस्ता दुभाजक तोडल्यानंतर तेथील मंजूर काम त्वरित का सुरु झाले नाही? असा सवाल उपस्थित केला जात असून जर काम उशीरा सुरु होणार असेल तर इतक्या घाईत रस्ता दुभाजक का तोडण्यात आल्याने येथील वाहचालक त्याचा वापर रस्ता ओलांडण्यासाठी करतील आणि त्यामुळे येथे भिषण अपघात होण्याची शक्यता निर्माण होईल याची कल्पना संबंधित कंपनीला नसेल का असाही सवाल काहीजण उपस्थित करत आहेत.