अब्बास शेख
दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथे मंगळवारी दोन युवकांवर झालेल्या प्राण घातक हल्ल्यातील आरोपींना यवत पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. केडगाव, यवत पोलीस गेल्या दोन दिवसांपासून या हल्लेखोरांचा शोध घेत होते.
पैशाच्या देवाणघेवाणीतून केडगाव येथील दोन युवकांवर 6 ते 7 जणांनी तलवार, कोयत्यांनी हल्ला करत जबर जखमी केले होते. या दोन्ही युवकांना मोहन जनरल हॉस्पिटल येथे वेळीच उपचार करण्यात आल्याने त्यांचे प्राण वाचले होते. या दोन युवकांवर हल्ला केल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले होते. आरोपी फरार झाल्यानंतर यवतचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे, ए.एस.आय गाडेकर, पोह विशाल जाधव, पोह. कापरे, तात्या कऱ्हे यांच्या टीमने आरोपींना शोधण्याची मोहीम हाती घेतली होती त्यामध्ये दोनच दिवसांत त्यांना यश आले आहे.
केडगाव येथे दोन युवकांवर हल्ला केल्या प्रकरणी यवत पोलिसांनी
1) सलमान जैनुउद्दीन राजे (वय 26 रा.केडगाव, ता. दौंड)
2) ज्ञानेश्वर दिलीप डोंगरे (वय 22 रा.इंदिरानगर, केडगाव)
3) तेजस उर्फ कार्तिक मारुती गायकवाड (रा. पत्राकंपनी चाळ ,केडगाव)
4) ओंकार कैलास मोहिते (वय 21 रा.आंबेगाव ,केडगाव.) अशी चार आरोपींची नावे असून यात प्रकरणामध्ये एक विधी संघर्ष ग्रस्त बालक वय 16 आणि दुसरा विधी संघर्ष ग्रस्त बालक वय 17 वर्षे 11 महिने यांना बाल न्यायालयात हजर करण्यात येत असल्याची माहिती यवतचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली आहे.
अशी घडली होती घटना..
मंगळवार दि.11 रोजी सायंकाळच्या सुमारास हर्षल गायकवाड आणि राहुल गायकवाड या दोन तरुणांचे सलमान राजे याच्या बरोबर पैशांच्या देवाण घेवाणीतून वाद होत होता. त्यावेळी सलमान राजे याने वरील दोन युवकांना आपल्या फ्लॅटमध्ये येण्यास सांगितले होते असे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून हर्षल आणि राहुल हे दोघेजण त्याच्या फ्लॅटवर गेल्यानंतर तिचे पाच ते सहा जणांनी या दोघांवर तलवार, कोयता सारख्या धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. हा हल्ला केवळ उसने घेतलेले पैसे देण्याच्या वादातून झाला असल्याची माहिती फिर्यादीने यवत पोलिसांना दिली आहे. या हल्ल्यातील बहुतांश युवक हे 20 ते 22 वयोगटातील असून यातील दोनजन विधी संघर्ष ग्रस्त बालक आहेत हे विशेष.
मंगळवारी केडगावचा आठवडे बाजार असतो. ऐन बाजाराच्या दिवशी एका बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये या दोन युवकांवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर ते जीव वाचविण्यासाठी अक्षरशः रस्त्याने पळत सुटले होते त्यावेळी केडगाव ग्रामपंचायत सदस्य नितीन जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळीच या जखमींना मोहन जनरल हॉस्पिटल येथे भरती केल्याने या युवकांचे प्राण वाचले आहेत.
भाईगिरीची हवा युवकांच्या डोक्यात…
संघटित होऊन भाईगिरी, गुन्हेगारी कृत्ये करण्याची हवा नुकत्याच तारुण्यात आलेल्या युवकांच्या डोक्यात घोळू लागली आहे. आई, वडिलांनी काबाडकष्ट करून लहानाची मोठी केलेली मुले चांगल्या कृत्यांऐवजी वाईट कृत्यांमुळे पेपर आणि न्यूज चॅनेलची ब्रेकिंग बातमी बनू लागले आहेत. याला घरातील काही पालकही जबाबदार असल्याचे समोर येत असून लहान मुलांसमोर भाईगिरी, माफियागिरी चे किस्से ऐकवले गेले की मुलांना त्याबाबत आकर्षण वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना आपल्या काळातील भाकड कथा सांगून त्यांची डोकी बिघडविण्यापेक्षा त्यांना संस्कार देण्याची गरज आहे तरच ही पिढी उद्या नाव उज्वल करेल अन्यथा एकतर पोलिसांची गोळी किंवा विरोधकाची बदला घेण्याची जिद्द केव्हा स्मशान भूमीचा रस्ता दाखवेल याची काहीच शास्वती नाही.